ऑनलाईन टीम / मुंबई :
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मात्र, यूजीसीनं परीक्षा घेण्यासंदर्भात नव्यानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट यूजीसीकडेच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न त्यांनी ट्विट करत विचारले आहेत.


रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींगा घेणाऱ्या #UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडं व्यक्त करतात.
पुढे ते म्हणाले, कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का? हा प्रश्न #UGC च्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा आणि विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा, अशी ही विनंतीही यावेळी केली.