Tarun Bharat

हिंदू देवतेचा अपमान केल्याची ट्विटर एमडी विरोधात तक्रार

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ट्विटरच्या भारतीय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्यासंदर्भात तक्रार सादर झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाने या प्रकरणी चौकशी सुरू केली. माहेश्वरी यांच्या ट्विटर हँडलवरून हिंदू देवतेचा अवमान करणारा आणि धर्मद्वेष पसरविणारा संदेश प्रसारित झाला आहे, असे तक्रारीत सांगण्यात आले. हा संदेश शेअर केल्याबद्दल ‘ऍथिस्ट रिपब्लिक’ या संस्थेविरोधातही तक्रार सादर करण्यात आली आहे.

केंद्र सरकार आणि ट्विटर इंडिया यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकारने सोशल मीडियासंबंधी केलेल्या नव्या कायद्यांचे क्रियान्वयन अद्याप ट्विटरने केलेले नाही. तक्रार अधिकाऱयाची नियुक्तीही केलेली नाही. तसेच शेतकरी आंदोलनाच्या काळात 26 जानेवारीला लाल किल्ला परिसर व दिल्लीत इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी गोळीबार केल्याचे खोटे वृत्त ट्विटरवरून प्रसारित करण्यात आले होते. काही केंद्रीय मंत्र्यांच्या संदेशांवर ट्विटरने टॅग लावला होता. अशा अनेक घटनांमुळे केंद्र सरकारने ट्विटरला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यात आता या नव्या तक्रारीची भर पडली आहे. ट्विटरवर केंद्र सरकारला कारवाई करावी लागेल, अशी चिन्हे आहेत.

कायदा पालनाची प्रक्रिया सुरू

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कायद्यांचे पालन ट्विटरकडून केले जात आहे, असा दावा या कंपनीच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. तक्रार अधिकारी नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे ट्विटरने स्पष्ट केले. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले.

error: Content is protected !!