अनंतनागमध्ये सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई : त्रालनंतर डोडा जिल्हा दहशतवाद्यांपासून मुक्त
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्हय़ात सोमवारी सकाळी सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई करत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना ठार मारले. खुलचोहर भागात पहाटे सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. या दहशतवाद्यांकडील एक एके-47 रायफल आणि दोन पिस्तुल जप्त केल्याची माहिती जम्मूöकाश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंह यांनी दिली.
दिलबागसिंह म्हणाले, या कारवाईमुळे त्राल जिल्हय़ानंतर आता डोडा जिल्हाही दहशतवाद्यांपासून मुक्त झाला आहे. ठार झालेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मसूद हा डोडा येथील शेवटचा दहशतवादी होता. डोडा येथील बलात्काराच्या एका प्रकरणात तो स्थानिक पोलिसांना वाँटेण्ड आहे. तथापि घटनेनंतर पळून जाऊन तो हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. ते म्हणाले, स्थानिक आरआर युनिटबरोबर पोलिसांनी अनंतनागमधील खुलचोहर क्षेत्रात सोमवारी पहाटे ही कारवाई पूर्ण केली. मसूदबरोबर लष्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी होते. त्यांनाही ठार करण्यात आले आहे. रविवारी रात्री 11 वाजता माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली आणि सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तिघांनाही ठार मारण्यात आले, असे दिलबागसिंह यांनी सांगितले. तर गेल्या सुमारे महिन्याभराच्या कालावधीत 49 दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलांना आणि स्थानिक पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे. तब्बल 17 चकमकी उडाल्या आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोणत्याही प्रकारचे इतर नागरी जीविताचे नुकसान न होता या कारवाया पूर्णत्वास नेल्याचे त्यांनी सांगितले. आता 1989 नंतर त्राल जिल्हय़ानंतर डोडा जिल्हाही दहशतवाद्यांपासून मुक्त झाला असल्याचे दिलबागसिंह यांनी सांगितले.