Tarun Bharat

हिजबुल कमांडर नालीसह पाच दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

‘ऑपरेशन ऑलआऊट’ गतिमान :  काश्मीरमध्ये दहशत : सीमेवरही पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती

श्रीनगर / वृत्तसंस्था

काश्मीरमधील शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी रविवारी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. सायंकाळी उशिरापर्यंत येथे चकमक व शोधमोहीम सुरू होती. आणखी दोन ते तीन दहशतवादी या भागात लपल्याचा संशय असून त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. खात्मा करण्यात आलेल्यांमध्ये हिजबुल कमांडर नाली याचाही समावेश आहे. दरम्यान, शोपियांबरोबरच कुपवाडा आणि उरी येथेही पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरू असून भारतीय लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्यदलाचे ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. या अभियानाअंतर्गत शोधमोहीम व प्रत्यक्ष कारवाईला गती देण्यात आली आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्हय़ातील रेबन गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्करासह सीआरपीएफच्या 178 बटालियन आणि एसओजी जवानांनी परिसराला घेराव घालण्यास सुरुवात केली. सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. परंतु सुरक्षा दलांनी आपल्याला वेढा घातल्याचे पाहून दहशतवाद्यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यानंतर उडालेल्या चकमकीत सायंकाळपर्यंत पाच दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात आले. कंठस्नान घालण्यात आलेल्या काही दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. मात्र, आठ दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीतून बचावलेला हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर फारुख अहमद भट उर्फ नाली याचा समावेश असल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले.

सैन्य दलाची शोधमोहीम सुरू

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सैन्य दलाची सुरू आहे. भारतीय सैन्य दलाकडून होत असलेल्या या कारवाईमुळे दहशतवादी बिथरले आहेत. यामुळेच ते आता सामान्य नागरिकांना आपले लक्ष्य बनवत असल्याचे दिसत आहे. शनिवारी काश्मीरमधील बारामुला जिल्हय़ात दहशतवाद्यांनी एका तरुणाची गोळय़ा झाडून हत्या केली होती. उत्तर काश्मीरमधील बोमाई परिसरात आदिपूर येथे रात्रीच्यावेळी दहशतवाद्यांनी अश्फाक अहमद नजर या 25 वषीय तरुणाच्या घरावर हल्ला केला होता.

अफवा टाळण्यासाठी इंटरनेट सेवा बंद

घटनास्थळी स्थानिकांकडून दगडफेक होऊ नये यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच अफवांना पायबंद घालण्यासाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. चकमकीची माहिती वेगाने पसरू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने सुरक्षा दल आणि पोलिसांचे पथक रात्री उशिरापर्यंत तेथेच तळ ठोकून होते. दहशतवाद्यांना घेराव घालून शरण जाण्यास सांगण्याचा प्रयत्न सुरू होता.

गोळीबार, घुसखोरीचा प्रयत्न उधळला…

काश्मीर सीमेवर पाक सैन्याने रविवारी पहाटेच्या सुमारास दहा ते बारा दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने उरी सेक्टरकडे आपला मोर्चा वळवत नागरी आणि सैन्य तळांवर निशाणा साधून भयंकर गोळीबार केला. या गोळीबारालाही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी सैन्य माघारी फिरले. कुपवाडय़ातील नौगम भागात पाक सैन्याने दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करताना नियंत्रण रेषाही ओलांडली होती. यासंबंधीची माहिती भारतीय जवानांना मिळताच पाकिस्तानी सैनिक पाकव्याप्त काश्मीरच्या भागात पळून गेले. दुसरीकडे, पाकिस्तानच्या सैन्याने उत्तर काश्मीरमधील युद्धबंदीचे उल्लंघन करत उरी सेक्टरअंतर्गत नियंत्रण रेषेच्या बाजूने असलेल्या भारतीय तळांवर गोळीबार केला. या गोळीबारामुळे भारतीय तळांमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Related Stories

‘निकटचा स्पर्श’ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

संयुक्त राष्ट्राच्या कौतुकामुळे भारतात समाधान

Patil_p

महिला आमदारानेच चालविला जेसीबी

Patil_p

देशात 23,068 नवे बाधित; 336 मृत्यू

datta jadhav

वायदे बाजारात सोने-चांदीचे दर घसरले

datta jadhav

लाल किल्ला हिंसाचार : दीप सिद्धूसह चौघांवर 1 लाखाचे बक्षीस

datta jadhav
error: Content is protected !!