कोव्हिड-19 विरुद्ध लढय़ासाठी पुढाकार, झोमॅटो फिडिंग व भटकणाऱया श्वानांसाठीही निधी सुपूर्द
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय संघातील स्टार फलंदाज रोहित शर्माने कोव्हिड-19 विरुद्धच्या लढय़ासाठी 80 लाख रुपयांचा निधी प्रदान केला. देश या संकटाचा सामना करत पुन्हा आपल्या पायावर सक्षमपणे उभे रहावा, यासाठी प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करणे महत्त्वाचे आहे, असे रोहित याप्रसंगी म्हणाला.
भारतीय वनडे संघाचे उपकर्णधारपद भूषवत असलेल्या रोहितने 45 लाख रुपये पंतप्रधान नागरिक सहायता निधी, 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी (महाराष्ट्र) कडे सुपूर्द केले.
याशिवाय, देशव्यापी लॉकडाऊनचा फटका बसलेल्या कुटुंबियांची मदत करत असलेल्या झोमॅटो फिडिंग इंडियाला त्याने 5 लाख रुपये प्रदान केले तर भटकणाऱया कुत्र्यांचे हाल होऊ नयेत म्हणून जे झगडतात, त्यांच्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला.
प्रत्येकाने वाटा उचलावा
‘देशाने आपल्या पायावर उभे रहावे, ही आपल्या सर्वांची गरज आहे आणि ही जबाबदारी मुख्यत्वेकरुन आपल्यावरच आहे. मी माझा छोटासा वाटा उचलला आहे. आपण आपले नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचे हात आणखी बळकट करायला हवेत’, असे रोहितने ट्वीट केले.
रोहित यासह सचिन तेंडुलकर, विद्यमान कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना व विद्यमान संघसहकारी अजिंक्य रहाणे यांच्या मांदियाळीत दाखल झाला आहे. विराट कोहलीने आपण किती मदत केली, हे जाहीर केलेले नाही. कोरोनाचा ज्या राज्यांना अधिक फटका बसला, त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
नीरज चोप्राकडूनही 3 लाख रुपये सुपूर्द


नवी दिल्ली : आशियाई सुवर्णजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने कोव्हिड-19 विरुद्धच्या लढय़ासाठी 3 लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला. केंद्रीय व हरियाणा राज्य सहायता निधीसाठी त्याने येथे पुढाकार घेतला. नीरज चोप्रा हा स्वतः तुर्कीमधून मायदेशी परतल्यानंतर एनआयएस पतियाळा येथे स्वयंप्रेरणेने क्वॉरन्टाईन राहत अहे. तुर्कीला तो प्रशिक्षणासाठी गेला होता.
‘मी पंतप्रधान नागरिक सहायता निधीसाठी 2 लाख रुपये व हरियाणा कोव्हिड सहायता निधीसाठी 1 लाख रुपये अदा केले आहेत. आपण सर्वांनी ताकदीनुरुप वाटा उचलावा आणि देशाच्या या लढय़ासाठी एकत्रित यावे’, असे ट्वीट त्याने केले. नीरज चोप्रा हा मूळ पानिपतचा असून टोकियो ऑलिम्पिकसाठी त्याने पात्रता मिळवली आहे. शिवाय, भारताच्या संभाव्य ऑलिम्पिक पदकाचा प्रबळ दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.