Tarun Bharat

हिरेबागेवाडीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

हिरेबागेवाडी, तालुका बेळगाव येथील आणखी नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आले. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला त्यांना घरी जाऊ देण्यात आले. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 79 वर पोहोचली आहे. हिरेबागेवाडीची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून या नऊ जणांना लागण झाली होती. उपचारानंतर ते बरे झाले आहेत. रविवारी त्यांना घरी जाऊ देण्यात आले.

रुग्ण क्रमांक 454, 700, 713, 714, 715, 718, 720, 722, 719 हे कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बिम्स प्रशासनाने दिली आहे. संपूर्ण जिल्हय़ात हिरेबागेवाडी या एकाच गावातील 49 जणांना कोरोनाची लागण झाली होती. याच गावातील एका वृद्धेचा मृत्यूही झाला होता.

उपलब्ध माहितीनुसार हिरेबागेवाडी येथील एकूण बाधितांची संख्या 49 होती. यापैकी एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत 45 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. आणखी चौघा जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून येत्या आठवडाभरात त्यांचाही अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे तबलिगी कनेक्शनची साखळी तुटत चालली आहे.

3 एप्रिल रोजी आलेल्या अहवालात हिरेबागेवाडी येथील एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या संपर्कातून बाधितांची संख्या अर्धशतकाच्या समीप पोहोचली होती. पोलीस, आरोग्य विभागाने या परिसरात जनजागृतीबरोबरच कोरोनामुक्ततेसाठी जणू अभियानच राबविले होते. या परिश्रमांचे फळ म्हणून आज हिरेबागेवाडी गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना दिसत आहे.

संपगावला दारू दुकाने बंदीचा आदेश

अजमेरहून संपगाव, ता. बैलहोंगलला परतलेल्या दोघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या गावात फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी संपगाव येथे पुढील आदेशापर्यंत दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानांना कुलूप लावून त्यांच्या चाव्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा त्या कार्यक्षेत्रातील दंडाधिकाऱयांकडे सोपविण्याची सूचना करण्यात आली आहे. संपगाव येथील बीसीएम हॉस्टेलमध्ये संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दारू दुकाने तात्पुरती बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

error: Content is protected !!