Tarun Bharat

हिवाळाः व्यायामासाठी सर्वोत्तम ऋतू

Advertisements

हिवाळा म्हणजे आरोग्य. हेमंत व शिशिर ऋतु यांचा मिळून हिवाळा बनतो. यात सूर्याचे दक्षिणायन सुरू असते. दिवस लहान व रात्र मोठी आणि याच विसर्ग काळात निसर्गाकडूनही बळ मिळत असते. वातावरणात गारठा वाढलेला असतो. सुस्ती, आळस येतो, त्यामुळे शारीरिक हालचाली कमी. परंतु जाठराग्नी प्रदीप्त असल्याने भूकही अधिक लागते. त्यामुळे चरबी वाढते, वजन वाढते, सुस्ती, आळस यामुळे कामेही कमी होतात. म्हणूनच व्यायामाने शरीरातील ऊर्जा सक्रिय राहिल्याने उत्साह, आनंद, काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच हिवाळय़ाची चाहूल लागली की व्यायामाची लगबग सुरू होते. लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तेग्निर्मेदसः क्षयः। विभक्त घन गात्रत्वं व्यायामाद् उपजायते। अष्टांग सूत्र व्यायामामुळे शरीर व मन ताजेतवाने होते. हलकेपणा आणते, शरीरातील शक्ती वाढते म्हणजेच स्टॅमिना वाढतो. अग्नी प्रदीप्त होतो. पचनशक्ती वाढते. शरीर पिळदार व घट्ट होते. शरीर बांधा व शरीरयष्टी व्यवस्थित राखायला मदत होते. शरीर उपचय उत्तम होते. शरीराला सौ÷त्व, सुडौलत्व प्राप्त होते. मांसपेशी स्नायू विभक्त दिसू लागतात व मुख्य म्हणजे मांसधातू स्थिर राहतो. अर्थातच स्थिर मांसधातूमुळे शक्ती, स्फूर्ती वाढतात व वय वाढले तरी तारुण्याचा अनुभव घेता येतो. आणि म्हणूनच संपूर्ण वर्षातील हिवाळा हा असा ऋतू आहे ज्यामुळे आपण आपल्या शरीरातील ऊर्जा, ताकद पुन्हा कमवू व मिळवू शकतो. या दिवसात एक सोपस्कार म्हणून व्यायामाकडे न बघता स्वतःसाठी स्वतःचा दिलेला अनमोल वेळ आणि स्वतःवर प्रेम करण्यासाठी निसर्गाने मिळवून दिलेली संधी या दृष्टीने बघितले तर नक्कीच याचा फायदा होणार आहे. व त्यासाठी काही गोष्टींचे ज्ञान अवगत करणे आवश्यक.

व्यायाम म्हटला की सातत्य टिकवायचे असल्यास प्रोत्साहन हवेच व त्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना सोबत घ्यावे किंवा प्रेरणादायी लोकांना फॉलो करावे. स्वतःलाच बक्षीस द्यावे. हिवाळा हा सर्वोत्तम ऋतू असल्याने शरीरशक्ती सर्वाधिक असते व म्हणूनच या ऋतूत मनसोक्त, यथाशक्ति सर्वाधिक व्यायाम करून स्टॅमिना वाढवून ती शक्ती उन्हाळा व पावसाळय़ात वापरता येते. उन्हाळय़ात घाम जास्त येतो त्यामुळे मध्यम व्यायाम करावा व पावसाळय़ात कमी. वात, पित्त प्रकृती असणाऱयांनी किंवा वात व पित्त दोषांचे असंतुलन असणाऱयांनी त्याचबरोबर लहान वयात व वृद्धांनी व्यायाम जपून करावा. गुलाबी थंडीत व्यायाम शरीराबरोबरच मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करून बल देणारा, एकंदर शरीर सामर्थ्य वाढवण्यास मदत करणारा किती, कोणता व कधी करावा याचे नियोजन करावे. व्यायाम हळूहळू वाढवावा जशी गाडी आपण न्यूट्रलमधून 100 च्या स्पीडने पळवतो तसेच व्यायामाचेही आहे अन्यथा इजा होते.

प्रकार

स्नायूंची क्षमता वाढवण्यासाठी वजन उचलण्यासारखे जिममधले व्यायाम. लवचिकता वाढवण्यासाठी योगासने, सूर्यनमस्कार. शरीराची क्षमता, स्टॅमिना वाढवण्यासाठी जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग स्विमिंग. केवळ वजन उचलण्याचा व्यायाम केल्यास स्नायू व सांध्यांना कडकपणा येतो. शरीराची ठेवणही बिघडू शकते. केवळ लवचिकता वाढवण्याचे व्यायाम केल्यास शरीराचा एण्डुरन्स व स्नायूंची क्षमता तेवढी वाढणार नाही. त्यामुळे आपण आपल्या प्रकृतीनुरूप वयानुरूप काय साध्य करायचे त्यानुसार प्रकार निवडावा. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी ‘वॉर्म अप’ करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्नायूचा रक्तपुरवठा वाढतो, स्नायू व्यायामासाठी तयार होतात. स्नायूंना हळूहळू सवय होते. त्यामुळे स्नायूमध्ये चमक भरणे, इजा होणे हे प्रकार कमी होतात. व्यायामानंतर ‘कुलडाउन’चेही महत्त्व अधिक आहे. अर्धा-पाऊण तास व्यायाम केल्यानंतर तो हळूहळू कमी करावा. अचानक थांबल्यास हृदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास अचानक कमी होईल आणि ते शरीरासाठी योग्य नव्हे. अशाने शरीरात उत्पन्न झालेली ऊर्जा बाहेर टाकण्यास मदत होते. हळूहळू स्नायूंना शिथिल केल्यामुळे, स्ट्रेच केल्यामुळे वेदना होत नाही किंवा कमी होतात. हाता पायाच्या बोटांची काळजी घ्या. थंडीच्या दिवसात शरीरातील रक्त जास्तीत जास्त मध्यभागात केंद्रित असते. त्यामुळे हातापायाच्या तळव्यांना कमी रक्तपुरवठा होतो. म्हणून बोटे, नाक, कान गारठू शकतात. थंडीच्या दिवसात कपडे उबदार, हलके व घाम शोषून घेणारे असावे. खूप घट्ट किंवा सैल नको त्वचेला श्वासोच्छवास घेता आला पाहिजे.

सुरक्षितता

पहाटे खूप लवकर निघाल्यास पुरेसा सूर्यप्रकाश नसतो. धुके असते, तेव्हा हेडटॉर्च वापरा. शक्मयतो कोणीतरी सोबत असावे व ओळखीच्या परिसरात जावे किंवा थोडासा उजेड पडल्यानंतर बाहेर पडावे. कपडे हलक्मया रंगाचे, दुरूनही रंग दिसेल असे व त्यावर चट्टेपट्टे असल्यास उत्तम. गाणी किंवा संगीत ऐकत असल्यास एकाच कानात इअरफोन घालावा.

पाणी

थंडीत तहान कमी लागते. परंतु त्याकडे लक्ष दिले पाहिजे. हायडेशन चांगले ठेवा.

चालणे, योग यामध्ये मनावरचा ताण कमी होतो. रक्ताभिसरण चांगले होते. लवचिकता वाढते. मज्जासंस्थेचे कार्य सुधारते. चालण्याच्या व्यायामामुळे शरीरामध्ये जी उष्णता तयार होते त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. रक्तशर्करा व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. चयापचयाची क्रिया उत्तम होते. मूड चांगला राहतो. डोळय़ांवरचा ताण कमी होतो. पाठदुखीपासून आराम मिळतो. रक्तदाब नॉर्मल राहतो. बाहू व पोटऱयांचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे रक्त गोठण्याचा धोका कमी होतो. हाडे बळकट होतात. दिवसभरात केव्हाही चालणे योग्य. परंतु जेवणानंतर दोन तासांनी चालणे फिटनेस व मधुमेह नियंत्रणात राखण्यास अधिक उत्तम. नियमित जितका वेळ तुम्ही चालता तितक्मया जलद गतीने कॅलरी घटण्यास मदत मिळते.

प्राणायाम भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम यासारख्या श्वसन क्रियांमुळे शरीरात प्राणशक्तीचा संचार अधिक चांगल्या प्रकारे होतो व त्यामुळे शरीर, मन व इंद्रिये यांचे कार्य उत्तम होते. अग्नी प्रदीप्त होतो व आरोग्य सुधारते. प्राणायामामध्ये श्वसनावर लक्ष दिले जाते, नियमित ध्यान केल्यास सजगता येते. धावणे, पोहणे, सायकलिंग, एरोबिक्स याने रक्ताभिसरण सुधारते. स्नायू लवचिक होतात. हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते व शरीर उबदार राहण्यास मदत होते. जिम, वेटलिफ्टिंग, जोर-बैठका, दंड मारणे यामुळे पिळदार शरीरयष्टी, बॉडी बिल्डिंग होते. परंतु हे योग्य मार्गदर्शनाखाली केलेले उत्तम. अन्यथा त्याचा फायदा होण्याऐवजी त्रास होतो.

आयुर्वेदात व्यायाम किती करावा याचे प्रमाण सांगितले आहे. अर्धशक्त्या निषेव्यस्तु: स्वतःच्या शक्तीच्या निम्म्या प्रमाणातच व्यायाम करावा. तोंडाने श्वास घ्यायची आवश्यकता भासू लागली, कपाळावर घाम येण्यास सुरुवात झाली की आपल्या शक्तीच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम झाला असे समजावे. सुरुवातीला 10 ते 15 मिनिटातच ही लक्षणे दिसतील परंतु सातत्य राहिल्यास कालावधी वाढेल. वजन जास्त असणाऱया किंवा वजन वाढण्याची प्रवृत्ती, बैठे काम, कफ प्रकृतीच्या लोकांनी व्यायाम अधिक करावा. मी दिवसभर खूप काम करते/करतो, माझा व्यायाम होतो हा साफ चुकीचा समज आहे. याने तुम्ही थकता परंतु व्यायामाने हलके व प्रसन्न वाटते. आरोग्य सुधारते. त्यामुळे ही सबब सांगून पळवाटा काढत असाल तर तुमचेच नुकसान आहे. व्यायामामध्ये खेळाचाही समावेश करता येतो. ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासात आमूलाग्र बदल घडतो. सकारात्मक विचारसरणी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व ध्येय उच्च बनते. मनावरचा ताण कमी होतो. एकाग्रता, चतुरता अचूकता निर्णयक्षमता वाढते. सजगता येते. क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस, फुटबॉल, मैदानी खेळाने ताकद वाढते. स्टॅमिना वाढतो. ऊब मिळते. रक्ताभिसरण चांगले होते. थोडक्मयात खेळ म्हणजे चैतन्य, मनावरची मरगळ दूर करण्याचे साधन. त्याची सवय-आवड बालपणापासूनच लावल्यास नक्कीच सर्वांगीण विकासामध्ये त्याचा फायदा होतो.

थोडक्मयात आरोग्यमय जीवनासाठी रोग बळावल्यानंतर त्याची भीती वाटून काहीच उपयोग नाही. त्यासाठी आधीच प्रयत्न करा. निरोगी, आनंदी, उत्साही, सुखी, समाधानी, आयुष्याचे धनी होण्याचे आपल्याच हातात असते हे तुम्ही ओळखा. सबब सांगून व्यायाम टाळू नका. असे करत असाल तर याचा अर्थ तुम्ही आळशी, निष्काळजी बनत आहात. चला तर मग, संकल्प करा. समृद्ध जीवनाची, आरोग्यमय आयुष्याची व्यायामासोबत कास धरा. चिरतारुण्याचा अनुभव घेत आनंदी आयुष्य जगा.

डॉ. वैशाली लोढा, आयुर्वेदाचार्य, योगशिक्षिका

Related Stories

जेवढी माणसाची विद्या तेवढी त्याची महत्त्वाकांक्षा

Patil_p

चर्चा फक्त कोरोना आणि राजकीय हादऱयांची!

Amit Kulkarni

चांदा ते बांदा नंतर सिंधुरत्न समृद्ध

Patil_p

जम्मू-काश्मीरमधील स्थित्यंतर

Patil_p

इतिहास ब्रेल लिपीचा…!

Patil_p

चिं. त्र्यं. खानोलकर : एक आगळा कादंबरीकार

Patil_p
error: Content is protected !!