आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदीचा भंग केल्याचा आरोप, अन्य 5 आरोपही मान्य केले
दुबई / वृत्तसंस्था
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकवर बुधवारी सर्व क्रिकेट प्रकारातून 8 वर्षांची बंदी लादली गेली. स्ट्रीकने आयसीसी भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदीचा भंग केल्याचे 5 आरोप मान्य केले आहेत. यात संघाच्या बैठकीतील माहिती उघड केल्याचाही समावेश आहे.
झिम्बाब्वेच्या सर्वोत्तम जलद गोलंदाजांपैकी एक असणाऱया स्ट्रीकने 2017 ते 2018 या कालावधीत प्रशिक्षक म्हणून काम पाहिले असून त्या कालावधीतील सर्व सामन्यांची चौकशी यादरम्यान केली गेली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच आयपीएल, बिग बॅश व अफगाणिस्तान प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये स्ट्रीकने काही भूमिका बजावल्या. त्याचीही चौकशी केली गेली असून त्यानंतर आयसीसीने आपला निर्णय जाहीर केला.
‘हीथ स्ट्रीक अनुभवी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक आहे आणि त्याने अनेक भ्रष्टाचार प्रतिबंधक सत्रांमध्ये सहभाग घेतला. शिवाय, जबाबदाऱयांची जाणीव त्याला होती. काही वेळा त्याने आयसीसीच्या तरतुदींचा भंग केल्याचे दिसून येते. शिवाय, त्याने आमच्या चौकशी प्रक्रियेत मदत तर केली नाहीच. त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला’, असे आयसीसीने पत्रकात म्हटले. आयसीसी तरतुदी तसेच प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धांमधील तरतुदींचा भंग केला असल्याचे सर्व आरोप यावेळी स्ट्रीकने मान्य केले.