मुंबई / ऑनलाईन टीम
सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची काल उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका होत होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून भाजपने राज्यातील ठाकरे सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
भाजप महाराष्ट्रा या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून भाजपने शिनसेनेवर टीका केली आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामं करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जातंय!’ .यासोबत भाजपकडून एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे यामध्ये दबाव असे देखील ठळक अक्षरात लिहिले आहे.


यासोबतच भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या देखील राजीनाम्याची मागणी चांगलीच लावून धरली आहे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपने प्रश्नांचा भडीमार केला आहे. वाझेंची नेमणूक चालवून घेतलीत, आता त्यांना सॅल्यूटही ठोका हा आदेश मानणार नाही सांगितल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली का?, हिरेन यांच्याबाबत बातम्या आल्यानंतरही वाझेंवर काहीच कारवाई झाली नाही. एनआयए चौकशी सुरू होईपर्यंत वाझेंना सांभाळून घेण्याचे आदेशच होते का?, असे अनेक प्रश्न भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारण्यात आले आहेत.
तर, सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने, आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला, तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केली होती.