Tarun Bharat

हॅलेप, सेरेना, जोकोविच, व्हेरेव्ह चौथ्या फेरीत

ओसाका, मुगुरुझा, साबालेन्का, थिएम यांचीही आगेकूच, श्वार्ट्झमन, शॅपोव्हॅलोव्ह, किर्गिओस पराभूत

वृत्तसंस्था/ मेलबर्न

अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रोमानियाची सिमोना हॅलेप, जपानची नाओमी ओसाका, ऍरीना साबालेन्का, स्पेनची गार्बिन मुगुरुझा, डॉमिनिक थिएम, अलेक्झांडर व्हेरेव्ह, अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविच यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळविले. दिएगो श्वार्ट्झमन, कॅनडाचा शॅपोव्हॅलोव्ह, किर्गिओस यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात असणाऱया सेरेनाने 19 वर्षीय ऍनास्तेशिया पोटापोव्हाचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सेरेनाने 25 अनियंत्रित चुका केल्या तरी ती विजय मिळविण्यात यशस्वी ठरली. गेल्या वर्षी सेरेनाने पोटापोव्हाला पहिल्या फेरीत हरविताना फक्त तीन गेम्स गमविले होते. तिची पुढील लढत सातव्या मानांकित ऍरीना साबालेन्काशी होईल. साबालेन्काने चौथी फेरी गाठताना ऍन ली हिचा 6-3, 6-1 असा पराभव केला. साबालेन्काने गेल्या 19 सामन्यात मिळविलेला हा 18 वा विजय होता.

हॅलेपचा आक्रमक खेळ

आक्रमक खेळणाऱया हॅलेपने चौथी फेरी गाठताना 32 व्या मानांकित व्हेरोनिका कुडरमेटोव्हाचा 6-1, 6-3 असा धुव्वा उडविला. हॅलेपने या सामन्यात 21 विजयी फटके मारताना चार बिनतोड सर्व्हिसही केल्या. तिची पुढील लढत प्रेंच ओपन चॅम्पियन इगा स्वायटेक किंवा फ्रान्सच्या फिओना फेरो यापैकी एकीशी होईल. तिसऱया मानांकित जपानच्या नाओमी ओसाकानेही शेवटच्या सोळा फेरीत स्थान मिळविले असून तिने टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉचा 6-3, 6-2 असा पराभव केला. तिची पुढील लढत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाशी होणार आहे. मुगुरुझाने कझाकच्या झरिना दियासचा 6-1, 6-1 असा केवळ 56 मिनिटांत धुव्वा उडविला.

 श्वार्ट्झमन, शॅपोव्हॅलोव्ह पराभूत

पुरुष एकेरीत आठव्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनला मात्र रशियाच्या पात्रता फेरीतून आलेल्या 114 व्या मानांकित असलन कारात्सेव्हने पराभवाचा धक्का दिला. ग्रँडस्लॅममध्ये पदार्पण करणाऱया कारात्सेव्हने श्वार्ट्झमनवर 6-3, 6-3, 6-3 अशी मात केली. पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूने चौथी फेरी गाठण्याची दहा वर्षानंतरची ही पहिलीच वेळ आहे. त्यावेळी मिलोस रेऑनिकने अशी कामगिरी केली होती. त्याची पुढील लढत 20 व्या मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासिमेशी होणार आहे. फेलिक्सने 11 व्या मानांकित डेनिस शॅपोव्हॅलोव्हचे आव्हान 7-5, 7-5, 6-3 असे संपुष्टात आणत आगेकूच केली आहे. जर्मनीच्या सहाव्या मानांकित व्हेरेव्हने फ्रान्सच्या ऍड्रियन मॅनारिनोचा 6-3, 6-3, 6-1 असा सरळ सेट्समध्ये पराभव करताना 19 बिनतोड सर्व्हिस केल्या. व्हेरेव्हने मॅनारिनोवर गेल्या वर्षी तीनदा विजय मिळविला होता. तिसऱया मानांकित थिएमला मात्र ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला. गेल्या सप्टेंबरमध्ये अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱया थिएमने किर्गिओसवर 4-6, 4-6, 6-3, 6-4, 6-4 अशी मात केली. चौथ्या फेरीत त्याची लढत ग्रिगोर डिमिट्रोव्हशी होईल. पाब्लो कॅरोनो बुस्टाने पहिले सात गेम्स झाल्यानंतर माघार घेतल्याने डिमिट्रोव्हला पुढे चाल मिळाली.

लॉकडाऊन जाहीर झाल्याने सामन्याला ‘ब्रेक’

एका क्वारन्टाईन हॉटेलमध्ये कोव्हिड 19 चे रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून व्हिक्टोरिया राज्य सरकारने पाच दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. त्यावेळी जोकोविच-टेलर फ्रिट्झ यांचा सामना सुरू होता. सामन्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना वेळेत घरी पोहोचता यावे, यासाठी स्थानिक वेळेनुसार रात्री 11.30 वाजता खेळ थांबविण्यात आला होता. मध्यरात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात होणार होती. प्रेक्षक बाहेर गेल्यानंतर काही वेळाने सामना पुन्हा सुरू करण्यात आला होता. या स्पर्धेसाठी स्टेडियम क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय टेनिस ऑस्ट्रेलियाने घेतला होता. पण आता लॉकडाऊन लागू केल्याने यापुढे प्रेक्षकांविना सामने खेळविले जाणार आहेत. लॉकडाऊन असले तरी स्पर्धा ठरल्याप्रमाणे पुढे चालू राहणार असल्याचे टेनिस ऑस्ट्रेलियाने सांगितले.

खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर पोटदुखीच्या त्रासाशी संघर्ष करीत असलेल्या जोकोविचने पाच सेट्सच्या लढतीत टेलर फ्रिट्झवर 7-6 (7-1), 6-4, 3-6, 4-6, 6-2 अशी मात केली. सुमारे साडेतीन तास ही झुंज रंगली होती. 14 व्या मानांकित कॅनडाच्या रेऑनिकशी त्याची पुढील लढत होणार आहे. रेऑनिकने मार्टन फुक्सोविक्सवर चार सेट्समध्ये मात करीत चौथी फेरी गाठली आहे. गेल्या वर्षी जोकोविचने रेऑनिकला या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरविले होते. त्याने एकूण 11 वेळा रेऑनिकला हरविले आहे. मात्र यावेळी त्याला फिटनेसची समस्या असल्याने रेऑनिकविरुद्ध खेळताना त्याला जड जाऊ शकते.

Related Stories

सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारत विजेता

Patil_p

आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धा रद्द

Patil_p

नवीन वर्षात टीम इंडियाची विजयी सुरुवात; श्रीलंकेवर ७ गड्यांनी मात

Archana Banage

एन्गिडीचे 6 बळी, ऑस्ट्रेलिया सर्वबाद 271

tarunbharat

आयसीसीकडून टी-20 खेळपट्टीला ‘अतिउत्तम’ शेरा

Patil_p

पॅरा नेमबाज अवनी लेखराला रौप्यपदक

Patil_p