Tarun Bharat

हेमंत शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री

गुवाहाटी / वृत्तसंस्था

आसामच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत बिस्वा शर्मा यांची वर्णी लागली आहे. गटनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज सोमवारी दुपारी ते पद व गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासमवेत राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्रीही शपथ घेतील. शपथविधीचा कार्यक्रम सोमवारी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसला दणका देण्याची शपथ घेऊन सहा वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या हेमंत शर्मा यांच्याकडेच अखेर मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. रविवारी आसाममध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, राज्यसभा खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, आसाम भाजपचे प्रभारी बैजयंत पांडा यांच्या उपस्थितीत भाजप तसेच भाजपला पाठिंबा देणाऱया  आमदारांची बैठक झाली. या बैठकीत हेमंत बिस्वा शर्मा यांची सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. यानंतर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. सोनोवाल आणि शर्मा यांनी शनिवारी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या दिल्ली दौऱयातच मुख्यमंत्रिपदाचा दावेदार निश्चित झाला होता. मात्र, नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते.

ईशान्य भारतातील प्रभावशाली नेते

हेमंत बिस्वा शर्मा यांचा संपूर्ण ईशान्य भारतात प्रचंड प्रभाव आहे. सोनोवाल सरकारमध्ये ते अर्थ, नियोजन, विकास, आरोग्य व कुटुंब कल्याण, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळत होते. भाजपच्या दिल्लीतील प्रमुख नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. ते 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. भाजपमध्ये आल्यापासून पक्षवाढीसाठी त्यांनी संपूर्ण ईशान्य भारतात प्रचंड काम केले. या कामगिरीचे पक्षनेतृत्त्वानेही वेळोवेळी कौतुक केले होते. त्यांच्या यशस्वी कामगिरीमुळेच यंदाच्या निवडणुकीत पुन्हा आसामची सत्ता मिळताच सोनोवाल यांच्याऐवजी हेमंत बिस्वा शर्मा यांच्याकडे आसामची सत्ता देण्याची चर्चा सुरू झाली होती.

भाजपप्रणीत रालोआला राज्यात स्पष्ट बहुमत

आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील रालोआने 75 जागा जिंकल्या. यात एकटय़ा भाजपने 60 जागांवर विजय मिळवला आहे. स्पष्ट बहुमत मिळवल्यामुळे रालोआला सलग दुसऱयांदा आसाममध्ये सत्ता राखणे शक्मय झाले. आसामच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी पक्षाने सलग दुसऱयांदा आसामची सत्ता राखली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीला 50 जागा जिंकता आल्या. यात काँग्रेस पक्षाच्या 29 जागांचा समावेश आहे.

Related Stories

जॉन्सन अँड जॉन्सनने मागे घेतला अर्ज

Patil_p

पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याची केंद्राची तयारी

Patil_p

सायरस मिस्री यांचा अपघाती मृत्यू

Patil_p

व्याधीग्रस्तांना लसीकरणासाठी डॉक्टरचे प्रमाणपत्र आवश्यक

Amit Kulkarni

जीएसटी संकलनाच्या विक्रमाची ‘गुढी’

Patil_p

शेतकरी आंदोलनावरून प्रतिष्ठितांचे शब्दयुद्ध

Patil_p