आयपीएल प्ले-ऑफसाठी आता आणखी चुरस रंगणार, पराभवामुळे राजस्थान सहाव्या स्थानी कायम
दुबई / वृत्तसंस्था
सलामीवीर जेसॉन रॉय (60) व कर्णधार केन विल्यम्सन (नाबाद 51) यांनी आक्रमक अर्धशतके झळकावल्यानंतर सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला 7 गडय़ांनी धूळ चारली असून या निकालामुळे आयपीएल प्ले-ऑफसाठीची समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. बाद फेरीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकल्या गेलेल्या हैदराबादला या विजयामुळे काहीच साध्य होण्यासारखे नाही. मात्र, राजस्थानची त्यांनी आता बरीच अडचण करुन ठेवली आहे.
या लढतीत राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या. यात कर्णधार संजू सॅमसनची 82 धावांची खेळी लक्षवेधी ठरली. मात्र, रॉय व विल्यम्सननी आणखी बहारदार फटकेबाजी करत हैदराबादला सहज विजय संपादन करुन दिला.
विजयासाठी 165 धावांचे आव्हान असताना सनरायजर्सतर्फे प्रथमच खेळत असणारा जेसॉन रॉय व साहा (11 चेंडूत 18) यांनी संघाला बिनबाद 57 धावा अशी उत्तम मजल मारुन दिली. ख्रिस मॉरिसच्या डावातील पाचव्या षटकात 4 चौकारांसह त्यांनी 18 धावा वसूल केल्या. फिरकीपटू लोमरोरने (1-22) ही जोडी फोडली. मात्र, नंतर विल्यम्सन व रॉय यांनी मैदानी फटक्यांवर भर देत 10 षटकात 1 बाद 90 धावांपर्यंत नेले. रॉयला 55 धावांवर जैस्वालने जीवदान दिले. पण, नंतर तो साकरियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. प्रियम गर्ग शून्यावर बाद झाला. पण, विल्यम्सन व अभिषेक शर्मा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
सॅमसनची फटकेबाजी
प्रारंभी, कर्णधार सॅमसनच्या 82 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 5 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. सॅमसनसाठी हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने नाबाद 70 धावांचे योगदान दिले होते.
सॅमसनने 57 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी करत ही झंझावाती खेळी साकारली. या खेळीसह तो या हंगामात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी देखील झेपावला. सध्या त्याच्या खात्यावर 433 धावा आहेत. या निकषावर त्याने दिल्लीच्या शिखर धवनला (430) मागे टाकले.
यशस्वी जैस्वाल (36), महिपाल लोमरोर (नाबाद 29) यांनीही थोडीफार फटकेबाजी केली. लोमरोरला 23 व 29 धावांवर दोन जीवदाने लाभली. रॉयल्सच्या डावात बहुतांशी वेळा चेंडू सहजपणे बॅटवर येत नसल्याने फटकेबाजीसाठी प्रतिकूल स्थिती होती.
हैदराबादचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (1-28) लेग स्टम्पच्या दिशेने उत्तम मारा करत इव्हिन लुईसला (6) डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरील अब्दुल समदकरवी झेलबाद केले. नंतर सनरायजर्सच्या गोलंदाजांनी काहीसा स्वैर मारा केला आणि याचा जैस्वालने बराच लाभ घेतला. त्याने 23 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 36 धावांचे योगदान दिले. जैस्वाल व सॅमसन यांनी पॉवर प्लेमध्ये 46 धावांपर्यंत मजल मारुन दिली.
नंतर या दोघांनी 56 धावांची भागीदारी साकारली. संदीप शर्माने जैस्वालला बाद केले. रॉयल्सवर दडपण राखण्याकरिता हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने अफगाणचा स्टार लेगस्पिनर रशिद खानला (1-31) पाचारण केले आणि लियाम लिव्हिंगस्टोन चुकीचा फटका मारत बाद झाला. लोमरोरने काही काळ आघाडी सांभाळली व त्यानंतर सॅमसन खऱया अर्थाने हैदराबादच्या गोलंदाजांवर बरसत राहिला. सिद्धार्थ कौलने (2-36) मात्र अखेरच्या षटकात सॅमसन व रियान पराग (0) यांचे बळी घेतले आणि यामुळे रॉयल्सला 164 धावांवर समाधान मानावे लागले.
धावफलक
राजस्थान रॉयल्स ः इव्हिन लुईस झे. अब्दुल समद, गो. भुवनेश्वर 6 (4 चेंडूत 1 चौकार), यशस्वी जैस्वाल त्रि. गो. संदीप शर्मा 36 (23 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), संजू सॅमसन झे. होल्डर, गो. कौल 82 (57 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), लियाम लिव्हिंगस्टोन झे. समद, गो. रशिद 4 (6 चेंडू), महिपाल लोमरोर नाबाद 29 (28 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रियान पराग झे. रॉय, गो. कौल 0 (1 चेंडू), राहुल तेवातिया नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 7 (बाईज 1, लेगबाईज 3, वाईड 3). एकूण 20 षटकात 5 बाद 164.
गडी बाद होण्याचा क्रम
1-11 (लुईस, 1.1), 2-67 (जैस्वाल, 8.4), 3-77 (लिव्हिंगस्टोन, 10.1), 4-161 (सॅमसन, 19.2), 5-162 (रियान पराग, 19.4).
गोलंदाजी
संदीप शर्मा 3-0-30-1, भुवनेश्वर कुमार 4-1-28-1, जेसॉन होल्डर 4-0-27-0, सिद्धार्थ कौल 4-0-36-2, रशिद खान 4-0-31-1, अभिषेक शर्मा 1-0-8-0.
सनरायजर्स हैदराबाद ः जेसॉन रॉय झे. सॅमसन, गो. साकरिया 60 (42 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), वृद्धिमान साहा यष्टीचीत सॅमसन, गो. लोमरोर 18 (11 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), केन विल्यम्सन नाबाद 51 (41 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), प्रियम गर्ग झे. व गो. मुस्तफिजूर 0 (1 चेंडू), अभिषेक शर्मा नाबाद 21 (16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 17 (बाईज 4, लेगबाईज 4, वाईड 9). एकूण 18.3 षटकात 3 बाद 167.
गडी बाद होण्याचा क्रम
1-57 (साहा, 5.1), 2-114 (जेसॉन, 11.6), 3-119 (प्रियम, 12.6).
गोलंदाजी
उनादकट 2-0-20-0, ख्रिस मॉरिस 3-0-27-0, मुस्तफिजूर रहमान 3.3-0-26-1, महिपाल लोमरोर 3-0-22-1, राहुल तेवातिया 3-0-32-0, चेतन साकरिया 4-0-32-1.
4 संघ प्रत्येकी 8 गुणांवर, म्हणूनच गुंतागुंत वाढली!
कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स हे 4 संघ सध्या प्रत्येकी 8 गुणांवर असून या चारही संघांचे प्रत्येकी 4 सामने बाकी आहेत. या चारही संघांसाठी प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची आशाअपेक्षा कायम आहे. यामुळे उर्वरित लढतीतील प्रत्येक निकालावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. सध्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई व दिल्ली अधिक प्रबळ दावेदार आहेत.