Tarun Bharat

हैदराबादसमोर पराभवाची श्रृंखला खंडित करण्याचे आव्हान

आयपीएल साखळी फेरीत आज पंजाब किंग्सचे आव्हान

चेन्नई / वृत्तसंस्था

यंदा आयपीएल मोसमातील सलग तीन पराभवांची अपयशी मालिका सनरायजर्स हैदराबादचा संघ आज (बुधवार दि. 21) पंजाब किंग्सविरुद्ध साखळी सामन्यात तरी खंडित करु शकणार का, याचे आज औत्सुक्य असेल. हैदराबाद संघाला सदर तिन्ही पराभव धावांचा पाठलाग करताना पत्करावे लागले आहेत. उभय संघातील आजची लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाणार आहे.

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सचा संघ हैदराबादपेक्षा किंचीत बरा खेळला असला तरी त्यांना 3 सामन्यात 2 पराभव पत्करावे लागले असून सध्या ते गुणतालिकेत सातव्या स्थानी फेकले गेले आहेत. धावांचा पाठलाग करणे, हे सनरायजर्स हैदराबाद संघासाठी तळपायाचे दुखणे ठरत आले असून ती श्रृंखला देखील आज खंडित करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध मागील लढतीत माफक धावसंख्येचे आव्हान असून देखील त्यांना ते पार करता आले नव्हते.

डेव्हिड वॉर्नरकडूनच अपेक्षा

सनरायजर्स हैदराबादच्या अंतिम एकादशमध्ये भारतीय संघातील राखीव खेळाडूंचा अधिक भर असून ही बाब त्यांना कोणत्याच निकषावर फलदायी ठरलेली नाही. साहजिकच, अव्वल दर्जाच्या डेव्हिड वॉर्नरने एकहाती सामना जिंकून देण्याची अपेक्षा या संघाला करावी लागणार आहे. मागील 3 सामन्यात त्याला केवळ 93 धावा जमवता आल्या असून आरसीबीविरुद्ध 54 धावा ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. अगदी अंतिम एकादशबाबत देखील वॉर्नरला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.

सध्या विदेशी खेळाडूत वॉर्नर व रशीद खान या दोघांचेच संघातील स्थान निश्चित असून मधल्या फळीत केन विल्यम्सनच्या गैरहजेरीचा हैदराबादला चांगलाच फटका बसत आला आहे. विशेषतः धावांचा पाठलाग करताना त्यांचे पितळ उघड पडत आले आहे. वृद्धिमान साहा खराब फॉर्ममध्ये असल्याने जॉनी बेअरस्टोकडे ही जबाबदारी सोपवली जाणार का, हे आज संघनिवडीत निश्चित होईल. मनीष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद या संघात आहेत. केदार जाधव व प्रियम गर्ग अद्याप पहिल्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. भुवनेश्वर कुमार व टी. नटराजन यांच्या खराब प्रदर्शनाचा संघाला फटका बसला आहे.

पंजाबही विजयाच्या शोधात

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सचा संघ देखील सध्या अपयशाच्या गर्तेतच अधिक आहे. या मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्ध सलामीचा सामना जिंकल्यानंतर त्यांना चेन्नई सुपरकिंग्स व दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलग पराभव पत्करावे लागले आहेत. चेन्नईविरुद्ध आघाडी फळी कोसळल्यानंतर पंजाबने केएल राहुल (61) व मयांक अगरवाल (69) यांच्या दमदार अर्धशतकामुळे दिल्लीविरुद्ध 4 बाद 195 पर्यंत जोरदार मजल मारली. पण, पंजाबच्या गोलंदाजांनी निराशा केली आणि त्यांच्या पदरी पराभव आला.

मोहम्मद शमी खराब फॉर्ममध्ये

या संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी खराब फॉर्ममध्ये आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियन जोडी झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथचा खराब फॉर्म केएल राहुलसाठी अधिक चिंतेचा आहे. रिचर्डसन व मेरेडिथ हे दोघेही त्यांनी खेळलेल्या सर्व सामन्यात महागडे ठरले आहेत. साहजिकच, केएल राहुलला आता ख्रिस जॉर्डनसारख्या पर्यायाचा विचार करणे आवश्यक असणार आहे. युवा अर्शदीप सिंगने पंजाबतर्फे आतापर्यंत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

प्रतिस्पर्धी संघ

सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यम्सन, विराट सिंग, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, जॉनी बेअरस्टो, जेसॉन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, जे. सुचित, जेसॉन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, रशीद खान, टी. नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी, शाहबाज नदीम, मुजीब उर रहमान.

पंजाब किंग्स ः केएल राहुल (कर्णधार व यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोईसेस हेन्रिक्यूज, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलन, सौरभ कुमार.

सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 पासून.

Related Stories

कृषी कायद्यांविरोधात २७ सप्टेंबरला भारत बंद, राकेश टिकैतांची घोषणा

Archana Banage

1 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व’

Tousif Mujawar

ऑस्ट्रेलियाचा साडेतीन दिवसातच एकतर्फी विजय

Patil_p

व्हेरेव्ह, बुस्टा, ब्रॅडी, ओसाका उपांत्य फेरीत

Patil_p

वानखेडेंना आणखी एक दणका; ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

datta jadhav

किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबादचा मुकाबला आज

Omkar B