प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर हॉस्पिटलने ज्या पद्धतीने भरमसाट बिल आकारणी केली आहे, त्याबद्दल ऍड. माधव चव्हाण यांनी संबंधित हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी हॉस्पिटलला कायदेशीर नोटीस बजावून वैद्यकीय उपचारासंबंधीचा सर्व तपशील व कागदपत्रांची मागणी करण्याचे ठरविले आहे. वैद्यकीय सेवा व उपचार देताना हॉस्पिटलने हलगर्जीपणा दाखविला. त्यामुळे रुग्णाच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण झाला व त्याच्या आरोग्याचे नुकसान झाले. म्हणून दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.
याशिवाय वैद्यकीय खर्चाचा सरकारी नियमानुसार लेखाजोखा पूर्ण करून अवास्तव व नियमाला सोडून आकारण्यात आलेल्या खर्चाच्या परतफेडीची मागणीसुद्धा सदर वकिलांनी करण्याचे ठरविले आहे. रुग्ण हक्क मागण्याच्या स्थितीत नसल्याने सार्वजनिक संघटनांनी त्यांच्यावतीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही सदर वकिलांनी केले आहे.