फलंदाज कोणीही, कितीही अव्वल असो. एखाद्या विदेश दौऱयात त्याच्याकडे जास्तीत जास्त 3 व त्यापेक्षाही जास्त म्हणजे कमाल 4 बॅट असू शकतात. एखादी बॅट मोडली किंवा खराब झाली तर दुसरे पर्याय असावेत, यासाठी 3 ते 4 बॅट सोबत असणे साहजिक मानले जाते. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये एक फलंदाज असाही आहे, ज्याने युएईमधील यंदाच्या आयपीएलसाठी थोडेथोडके नव्हे तर चक्क 9 बॅट नेले आहेत. तो फलंदाज आहे मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा अव्वल फलंदाज, कर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ओळखला जातो तो स्फोटक फलंदाज या नात्यानेच आणि यंदाच्या आयपीएलमधील परिस्थिती ओळखून त्याने चक्क 2-3 नव्हे तर 9 बॅट संयुक्त अरब अमिरातीला नेल्या आहेत. आपल्याला ज्या क्रिकेट प्रकारात खेळायचे आहे, त्यातील बॅट किती काळ सोबत देऊ शकते, यावर हा निर्णय बेतलेला असल्याचे रोहितचे म्हणणे आहे. ‘एरवी माझी बॅट बरीच टिकते. बरीच टिकते. कदाचित चार ते पाच महिने. पण, सरतेशेवटी मी ज्या क्रिकेट प्रकारात खेळत असतो, ते ही महत्त्वाचे. जेव्हा आपण टी-20 खेळत असतो, त्यावेळी त्यात विस्फोटक फटके हाणणे अतिशय निकडीचे असते. किंबहुना उत्तूंग फटक्यांचाच टी-20 हा खेळ आहे. विभिन्न फटक्यांचा सराव सातत्याने करावा लागतो. त्यामुळे, एखादी बॅट तुटण्याची शक्यताही असते. दुसरीकडे, सध्याची परिस्थिती पाहता, आवश्यकतेनुसार, आणखी बॅट जरी मागवली तरी त्याचे कुरियर वेळेत पोहोचणार का, याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे, मी यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी 9 बॅट सोबत घेण्याचा निर्णय घेतला’, असे रोहित याबद्दल तपशीलवार बोलताना म्हणाला. यापूर्वी अबु धाबीतील शेख झाएद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या लढतीत रोहित शर्माने 80 धावांची बहारदार खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे मुंबईने या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. त्यापूर्वी या हंगामातील सलामी लढतीत मुंबईला चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून पाच गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला होता. नंतर त्यांनी केकेआरला 49 धावांनी नमवत त्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. यापुढील वाटचालीत देखील मुंबईसाठी 9 बॅट भात्यात असलेल्या रोहित शर्माचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.


previous post
next post