Tarun Bharat

होल्डर, कॅम्पबेल यांची अर्धशतके

न्यूझीलंडचा विजय लांबला, फॉलोऑननंतर विंडीज 6 बाद 244

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

न्यूझीलंड संघ दुसऱया कसोटीत विंडीजवर डावाने विजय मिळविण्याच्या मार्गावर असून रविवारी तिसऱया दिवशी अंधुक प्रकाशामुळे तसेच विंडीज कर्णधार होल्डरच्या कडव्या प्रतिकारामुळे न्यूझीलंडचा विजय लांबणीवर पडला आहे. फॉलोऑननंतर विंडीजने दुसऱया डावात 6 बाद 244 धावा जमविल्या असून डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप 85 धावांची जरूरी आहे.

अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला तेव्हा कर्णधार होल्डर 60 व जोशुआ दा सिल्वा 25 धावांवर खेळत होते. या दोघांनी मिळून आतापर्यंत 74 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5.30 वाजता काळे ढग जमल्यानंतर पंचांनी विंडीज फलंदाजांना लाईटसाठी ऑफर दिली ती त्यांनी मान्य केली. बराच वेळ त्यात काहीच सुधारणा न झाल्यामुळे अखेर खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला गेला.

त्याआधी विंडीजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलने 68 धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी करताना तिसऱया गडय़ासाठी ब्रुक्ससमवेत 89 धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा विजय लांबविण्याचा प्रयत्न केला. या मालिकेत विंडींजच्या आघाडीच्या फलंदाजांना आतापर्यंत फारशी भरीव कामगिरी करता आलेली नाही. याआधीच्या तीन डावात त्यांना एकदाही 250 धावांची मजल मारता आलेली नाही. पहिल्या कसोटीत 138 व 247 धावा जमविल्या होत्या आणि त्यात त्यांना एक डाव 134 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. येथील सामन्यातही त्यांचा पहिला डाव केवळ 131 धावांत आटोपल्याने न्यूझीलंडला 329 धावांची आघाडी मिळाली. फक्त जर्मेन ब्लॅकवूडने 69 धावांचे योगदान दिले. याशिवाय कॅम्पबेल व ब्रुक्स यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. टिम साऊदी व जेमीसन यांनी भेदक मारा करीत प्रत्येकी 5 बळी मिळविले. फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱया डावात मात्र विंडींजच्या फलंदाजांनी सुधारित कामगिरी केली असून सामना चौथ्या दिवसावर नेण्यात त्यांनी यश मिळविले आहे.

कॅम्पबेल व होल्डर यांच्या अर्धशतकांमुळे या मालिकेत पहिल्यांदाच विंडीजला 250 धावांचा टप्पा ओलांडण्याची संधी मिळाली आहे. चौथ्या दिवशी विंडीजचे उर्वरित फलंदाजांना झटपट गुंडाळून सामन्यासह मालिकेत क्लीन स्वीप साधण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल. या विजयानंतर न्यूझीलंड विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडला मागे टाकत तिसऱया स्थानावर पोहोचणार आहे. याशिवाय कसोटी इतिहासात पहिल्यांदाच त्यांना अग्रस्थान मिळविण्याची संधीही मिळणार आहे.

वेगवान चौकडी हे न्यूझीलंडच्या या मालिकेतील यशाचे मुख्य कारण आहे. उंची व वेग असलेल्या काईल जेमीसन या नवोदित गोलंदाजाने साऊदी, बोल्ट, वॅग्नर या प्रमुख गोलंदाजांना पूरक साथ देत चांगले योगदान दिले आहे. विंडीजच्या पहिल्या डावात त्याने 34 धावांत 5 बळी टिपले असून चार कसोटीत त्याने दुसऱयांदा पाच बळी मिळविण्याचा पराक्रम केला आहे. तिसऱया दिवशी 8 बाद 124 धावांवरून वेंडीजने पहिला पुढे सुरू केल्यानंतर साऊदीने गॅब्रियलला त्रिफळाचीत करून विंडीजचा डाव संपविला. साऊदीने 32 धावांत 5 बळी मिळविले असून त्याचे आता 294 कसोटी बळी झाले आहेत. तो लवकरच बळींचे त्रिशतक पूर्ण करीत हॅडली व व्हेटोरी यांच्यानंतर हा पराक्रम करणारा न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज होण्याच्या मार्गावर आहे.

विंडीजतर्फे या मालिकेत फक्त ब्लॅकवूडने न्यूझीलंडच्या अपरिचित व कठीण वातावरणात चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने पहिल्या कसोटीच्या दुसऱया डावात शतक झळकवले तर येथील पहिल्या डावात 69 धावा जमविल्या. दुसऱया डावात मात्र तो आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात 20 धावांवर बाद झाला. विंडीजला पराभव टाळता येणार नसला तरी न्यूझीलंडला पुन्हा फलंदाजी करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न त्यांना करता येऊ शकतो. यासाठी होल्डर व दा सिल्वा यांना मोठी भागीदारी करण्याची गरज आहे.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प.डाव 460, विंडीज प.डाव 56.4 षटकांत सर्व बाद 131 : कॅम्पबेल व ब्रुक्स प्रत्येकी 14, ब्लॅकवूड 69 (92 चेंडूत 11 चौकार), गोलंदाजी : साऊदी 5-32, जेमीसन 5-34, वॅग्नर 0-28, बोल्ट 0-34. फॉलोऑननंतर दुसरा डाव 65.4 षटकांत 6 बाद 244 : क्रेग बेथवेट 24 (42 चेंडूत 3 चौकार), कॅम्पबेल 68 (109 चेंडूत 8 चौकार), ब्रॅव्हो 4, ब्रुक्स 36 (72 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), रॉस्टन चेस 0, ब्लॅकवूड 20 (33 चेंडूत 1 चौकार), होल्डर खेळत आहे 60 (89 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), दा सिल्वा खेळत आहे 25 (39 चेंडूत 2 चौकार), अवांतर 7. गोलंदाजी : बोल्ट 3-75, जेमीसन 2-43, वॅग्नर 1-53, साऊदी 0-63).

Related Stories

विंडीज-झिंबाब्वे कसोटी सामना अनिर्णित

Patil_p

रवि दहियाच्या ऑलिम्पिक पदकाची ‘नहरी’ला प्रतीक्षा!

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

टी-20 मानांकनात कोहलीचे स्थान कायम, केएल राहुल सहावा

Patil_p

स्पर्धा रद्द, तरीही विम्बल्डन बक्षीस रक्कम प्रदान करणार

Patil_p

आयपीएल स्पर्धा जुन्या पद्धतीप्रमाणे खेळविणार

Amit Kulkarni