Tarun Bharat

।। नका करू नाश आयुष्याचा ।।

वैयक्तिक समस्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व समस्या सोडवण्याचे ज्ञान, शक्ती आणि पवित्रता सर्वसमावेशक हरिनाम जप करण्यामध्ये आहे. या हरिनामाचा प्रसार आणि प्रचार जगाच्या कल्याणासाठी व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे जगभरातील 700 पेक्षा जास्त हरे कृष्णा मंदिरातून लाखाहून जास्त प्रचार केंद्रातून कोटय़वधी भक्त आणि हितचिंतक यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर 17 ते 23 पर्यंत आंतरराष्ट्रीय हरिनाम उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हरिनाम का महत्त्वाचे आहे हे सांगण्याचा नम्र प्रयत्न येथे आम्ही करत आहोत.

संत तुकाराम महाराज एका प्रसिद्ध अभंगात सांगतात. नाम घेता उठाउठी । होय संसाराची तुटी ।। 1 ।।  ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ।। 2।। नामापरिते साधन नाही । जे तू करिसी आणीक कांही ।। 3।। हाकारोनी सांगे तुका । नाम घेता राहू नका ।।4।। ‘हरिनामाचा जप करताक्षणीच संसार बंधन तुटते, म्हणून असा लाभ तुम्ही आपल्या पदरी बांधा म्हणजे त्या योगाने तुम्ही नित्य विठ्ठलाच्या चरणाशी दृढ राहाल. हरीच्या नामाखेरीज हरीची प्राप्ती होण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नाही. तुकाराम महाराज हाक मारून (जोराने) सांगत आहेत की हरीचे नाव जप केल्यावाचून राहू नका. ‘होय संसाराची तुटी’ म्हणजे काय? तर जन्म, मृत्यू, म्हातारपण आजार यासहित सर्व दु:खापासून मुक्तता. ही सर्व दु:खे आपल्याला शरीर आहे म्हणून येतात. सद्यस्थितीत आपण विसरून गेलो आहोत की आपण स्वतःला जे समजतो ते शरीर नसून सनातन ‘आत्मा’ आहोत. स्वतःला अज्ञानाने आपण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, भारतीय, अमेरिकन, आफ्रिकन, आस्टेलियन, जपानी, पाकिस्तानी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, काळा, गोरा, स्त्री, पुरुष, लहान, मोठा, गरीब, श्रीमंत अशा अनेक उपाधी धारण करून समाजात वावरत आहोत. या शरीर भेदामुळेच आपल्यामध्ये आपपर भाव निर्माण होऊन वैर निर्माण होते व वैयक्तिक स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कलह आणि युद्धाचे प्रसंग निर्माण होतात. यासाठी सर्वानी हे जाणले पाहिजे की आपण सर्वजण ‘आत्मा’ आहोत. केवळ आत्मा याच स्तरावर सर्व जग शांती आणि सामंजस्य याचा अनुभव करू शकते. त्याच्या पुढची पायरी आहे ‘आत्मा’, हे जाणल्यावर आपण ‘परमात्मा’ चे अंश आहोत व एकाच प्रेमळ पित्याचे अंश आहोत हे सत्यपण अनुभवाला येते. स्वतः परमात्मा भगवान श्रीकृष्ण आपल्याला गीतेमध्ये सांगत आहेत. (गीता 15-6)  ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन: । मन:ष÷ानीन्दियाणि प्रकृतिस्थानि कर्षति अर्थात बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. या श्लोकांमधून हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपण भगवंताचे सनातन अंश असूनसुद्धा मन आणि इंद्रियाच्या अधीन होऊन या जगामध्ये दु:ख भोगत आहोत आणि या सर्व दु:खातून मुक्त होण्यासाठी भगवंतांनी आपल्याला विवेकबुद्धी असलेला मनुष्यदेह दिला आहे. म्हणून हा मनुष्यदेह पशु पक्ष्यांसारखा केवळ आहार, निद्रा, मैथुन आणि भय यासारख्या क्षुल्लक क्रिया करण्यातच वाया न घालवता ज्याला विसरून आपण सर्व दु:खे  भोगत आहोत त्या भगवान श्रीकृष्णाची पुनःप्राप्ती करण्यासाठी केला पाहिजे.

‘ऐसा लाभ बांधा गाठी’ म्हणजे प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करावा की आपण ज्या गोष्टी आयुष्यामध्ये करतो आहोत त्या आपल्याला सनातन आनंद देतात का? कारण ‘आत्मा’ या दृष्टीने आपल्याकडे जे काही आहे त्याचा ‘आत्माशी’ काहीही संबंध नाही. त्या वस्तू फक्त शरीरालाच तात्पुरते सुख देतात व पुन्हा आपल्याला दु:खाला सामोरे जावे लागते. मग त्या तात्पुरत्या सुखाचा काय लाभ झाला? ज्याप्रमाणे समुद्रातील मासा पाण्याबाहेर काढून त्याला आलिशान बंगला, पंचपक्वान्न, महागडी गाडी देऊन आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो आनंदित आणि जिवंत राहू शकेल का? त्याला या सर्व वस्तूंचा काही लाभ आहे का? त्याचा स्वभाव आहे पाण्यात स्वच्छंद पोहणे, त्याला वर उल्लेखित कोणत्याही वस्तूंची गरज नाही. त्याचप्रमाणे ‘आत्मा’ म्हणून आपला स्वभाव आहे कायम श्रीकृष्ण भावनेमध्ये राहण्याचा. इतर कशामुळेही या जगामध्ये सुख व आनंद ‘आत्मा’ला प्राप्त होत नाही आणि शेवटी म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू अटळ आहेच, मग सर्व गोष्टींचा तथाकथित उपभोग करून काय लाभ झाला?

पण याच सर्व गोष्टी आपल्या इंद्रियांना तृप्त न करता भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रसन्नतेसाठी केल्या तर आपल्याला भागवत्प्राप्ती निश्चितच होईल. म्हणून ‘विठ्ठलपायीं पडे मिठी’ अर्थात भगवंताच्या चरणांचा आश्रय घ्यावा यातच मनुष्यजीवनाचा खरा लाभ आहे.

नामापरिते साधन नाही । जे तू करिशी आणिक कांही ।। म्हणजे हरिनाम जप करणे याशिवाय कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीसाठी दुसरे कोणतेही साधन नाही. याला प्रमाण म्हणून बृहननारदीय पुराणमध्ये सांगितले आहे हरेर्नाम हरेर्नाम  हरेर्नामैव केवलम् । कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा ।। अर्थात कलह आणि दंभयुक्त अशा या कलियुगामध्ये भागवत भक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. अन्य कोणतीही गती नाही, अन्य कोणतीही गती नाही, अन्य कोणतीही गती नाही असे तीन वेळा ठासून सांगितले आहे. त्याचप्रमाणे श्रीमद् भागवतच्या 12 व्या स्कंधामध्येही वर्णन येते की कलेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्येको महान् गुण: । कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसङ्ग: परं व्रजेत्  कलियुग हे अनेक दोषांनी, संकटांनी, कलहांनी भरलेले आहे. अशा या अंधकारमय कलियुगामध्ये एकच चांगला गुण आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचा नित्यनियमाने जप करणे. कारण या हरिनामाच्या जपाने आपले जीवन, चित्त व अंतःकरण सर्व काही शुद्ध होते व आपण ज्या सुखाच्या शोधात आहोत ते ‘आत्मसुख’ तात्काळ प्राप्त होते आणि जीवनांती वैकुंठ म्हणजे जिथे कोणत्याही प्रकारचे दु:ख नाही असे भगवतधाम प्राप्त करू शकतो. याच्यासाठी हाकारोनी सांगे तुका । नाम घेता राहू नका ।। प्रत्येकाला हाक मारून सांगत आहोत हरिनाम जप केल्याशिवाय राहू नका. आता तरी पुढे हाचि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ।। 1।। सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ।।2।। हित ते करावे देवाचे चिंतन । करूनिया मन एकविध ।।3।। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा फार काय शिकवावे ।।4।। तुकाराम महाराज सर्वाना हात जोडून नम्रपणे अंतःकरणपूर्वक कळकळीची विनंती करत आहेत की आपल्या दुर्लभ अशा मनुष्यजन्माचा विनाकारण नाश करू नका. सर्वांच्या पायावर डोके ठेवून मी नमस्कार करून विनंती करतो की सर्वांनी हरिनामाचा जप नित्यनियमाने करून आपले चित्त शुद्ध करावे. आपले मन एकनि÷ करून भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करण्यातच आपल्या मनुष्यदेहाचे हित आहे. आता तुम्हाला फार काय सांगावे ज्यामध्ये आपले परम हित आहे असाच व्यापार करा. व्यापारी जसा विचार करतो की मी काय भांडवल टाकले की मला किती फायदा होईल. तसा विचार करा की हरिनामाचे भांडवल जमा केल्याने सर्व दु:खातून कायमचे मुक्त होण्याचा मला लाभ होईल. जो इतर कशानेही होणार नाही. परिणामी आपण मन आणि इंद्रियाचे सेवक न बनता आपली ‘स्वरूप स्थिती’ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे नित्यप्रेमही पुनः प्राप्त करू शकतो. त्यासाठी सर्वाना नम्र आवाहन आहे की दिवसातील थोडा तरी वेळ विशेषतः प्रातःकाळी हरे कृष्ण महामंत्राचा जप नित्यनियमाने करावा व पुढील आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी गीता, भागवत या ग्रंथांचे नियमित वाचन करावे.   हरि ॐ तत्सत ।

वृंदावनदास

Related Stories

धर्म भारतीय

Patil_p

परीक्षेच्या वादावर पडदा

Patil_p

कलियुगाची आचारसंहिता – श्रीमद् भागवत

Patil_p

घोकंपट्टीपासून सुटका

Patil_p

कर्नाटकात कोरोना नियंत्रणात मात्र हिवाळा धोक्याचा!

Patil_p

‘मेक्झिट’च्या निमित्ताने…

Patil_p