ज्यो बायडेन यांच्याकडून नावे घोषित :
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी स्वतःच्या कॅबिनेटची घोषणा केली आहे. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात डेप्युटी सेक्रेटरी राहिलेले अँटनी ब्लिंकेन यांची विदेशमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे, तर वकील एलेजांद्रो मयोरकास यांना सेक्रेटरी ऑफ होमलँड सिक्युरिटीचा (अंतर्गत सुरक्षा विभाग) पदभार सोपविण्यात आला आहे. एलेजांद्रो यांनी यापूर्वी होमलँड सिक्युरिटीचे उपसचिव म्हणून काम पाहिले आहे.
बायडेन यांच्या कार्यकाळासाठी ऐवरिल हेन्स यांना डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजेन्स म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ऐवरिल यांनी सुमारे दशकापेक्षा अधिक काळापासून बायडेन यांच्यासाठी विविध पदांवर काम केलेले आहे. या पदासाठी नियुक्त होणाऱया ऐवरिल पहिल्या महिला ठरल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी म्हणून लिंडा टॉमस ग्रीनफील्ड यांची निवड बायडेन यांनी केली आहे. जेक सुल्लिवन यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती मिळणार आहे. माजी विदेशमंत्री जॉन केरी यांना हवामान बदल विषयक अध्यक्षांचे विशेष दूत म्हणून नियुक्त केले जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत या पदावर विराजमान होणारे केरी हे पहिले अधिकारी ठरतील.
माला अडिगा यांची निवड
ओबामा प्रशासनात जिल बायडेन यांच्या सामाजिक सचिव राहिलेल्या कार्लोस एलिहोन्दो आताही हेच पद सांभाळणार आहेत. माला अडिगा या जिल यांच्या धोरणात्मक संचालक म्हणून काम करतील. प्रथम महिला म्हणून जिल यांची प्राथमिकता ठरविण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.
पाकिस्तानला नव्या प्रशासनाकडून कठोर संदेश
भारत आणि अमेरिका ‘वेगाने आक्रमक’ होणाऱया चीनच्या स्वरुपात एकसमान आव्हानाला तोंड देत आहेत. चीनविरोधात बळकट स्थिती कायम राखण्यासाठी भारताने अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार व्हावे असे अमेरिकेचे भावी विदेशमंत्री अँटनी ब्लिंकेन यांचे मानणे आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आघाडीला कमकुवत करत चीनच्या महत्त्वपूर्ण सामरिक लक्ष्यांना पुढे नेण्यास मदत केल्याचा आरोप ब्लिंकेन यांनी केला आहे. बायडेन प्रशासन दक्षिण आशियात दहशतवाद कदापिही सहन करणार नाही. सीमेपलिकडून असो किंवा इतर ठिकाणांहून होणारा दहशतवाद अमान्य असल्याचे म्हणत ब्लिंकेन यांनी पाकिस्तानला कठोर संदेश दिला आहे.
चीन स्वतःच्या आर्थिक शक्तीच्या बळावर इतरांना दडपू पाहत आहे. चीन स्वतःच्या हितांचा विस्तार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांकडे दुर्लक्ष करून पोकळ सागरी तसेच क्षेत्रीय दावे करत आहे. चीनच्या या वृत्तीमुळे काही महत्त्वाच्या समुद्रांमध्ये नौवहनाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे. भारत आणि चीनदरम्यान मे महिन्यापासून पूर्व लडाख क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव सुरू असल्याचे ब्लिंकेन म्हणाले.
चीनविरोधातील प्रयत्नात भारत एक महत्त्वाचा भागीदार असावा असे उद्गारही त्यांनी काढले आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भूमिका पार पाडावी. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारताला सदस्यत्व मिळवून देण्यासाठी बायडेन प्रशासन मदत करणार आहे. भारताची सुरक्षा मजबूत करण्यासाठी मिळून काम करू आणि दहशतवादविरोधी भागीदार म्हणून त्याच्या क्षमता वाढवू, असे उद्गार ब्लिंकेन यांनी काढले आहेत.