वृत्तसंस्था/ लंडन
बॅटल ऑफ ब्रिट्स टेनिस स्पर्धेतील पहिलाच सामना जिंकलो असलो तरी आपल्याला फार मोठी अपेक्षा नसल्याचे ब्रिटनच्या अँडी मरेने सांगितले. दुखापतीतून बरा झाल्यावर त्याने सात महिन्यानंतर या स्पर्धेत विजयी पुनरागमन केले.
33 वर्षीय मरे जानेवारी 2019 नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्यास उत्सुक झाला आहे. पुढील काही महिन्यात अमेरिकन व पेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा होणार आहेत. त्यात खेळण्याची त्याची इच्छा आहे. मागील वर्षी पार्श्वभागावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली होती. येथील सामन्यात खेळताना त्याच्या हालचालीत सुस्तपणा दिसत होता. तरीही त्याने जागतिक क्रमवारीत 211 व्या स्थानावर असणाऱया लियाम ब्रॉडीवर 6-2, 6-2 असा विजय मिळविला. ‘मला अनेकदा दुखापतींना सामोरे जावे लागले असल्याने माझ्या हालचाली मंदावल्या आहेत. म्हणूनच मी जास्त अपेक्षा धरलेली नाही. सात महिन्यानंतर पहिलाच सामना खेळत होतो. पण त्याआधी पुरेसा सरावच केला नव्हता,’ असे तो म्हणाला
त्याची पुढील लढत ब्रिटनचा नंबर 2 खेळाडू काईल एडमंडशी होणार आहे. ही स्पर्धा रोहॅम्प्टन येथे खेळविली जात असून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जात आहे. बॉल बॉय व गर्ल्स आणि लाईन जजेसना तसेच प्रेक्षकांना या स्पर्धेत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंना चेंडू व टॉवेल्स स्वतःच घ्यावे लागत आहे तर लाईनकॉल्सच्या निर्णयासाठी पंच हॉकआयचा वापर करीत आहेत.