ग्रँडस्लॅम- जपानचा निशिकोरीही तिसऱया फेरीत
अँड्रीस्क्यू व डेनिस शापोव्हॅलोव्ह या कॅनडाच्या दोन खेळाडूंनी अमेरिकन ओपन स्पर्धेच्या तिसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, जपानचा केई निशिकोरी यांनीही तिसरी फेरी गाठली आहे.
माजी विजेत्या अँड्रीस्क्यूने अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसवर 6-4, 6-4 असा विजय मिळविला आणि 2019 मधील जेतेपदाची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. सहाव्या मानांकित 21 वर्षीय अँड्रीस्क्यूला या सामन्यात फर्स्ट सर्व्हवेळी झगडावे लागले आणि दुसऱया सेटमध्ये तर तिने तीनदा डबल फॉल्ट केले. मात्र तीनही ब्रेकपॉईंटच्या संधीचा उपयोग करीत तिने विजय निश्चित केला. हा सामना बराच अवघड होता, असे ती नंतर म्हणाली. 2019 मध्ये बियान्काने सेरेना विल्यम्सचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती. तिचे ते पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद होते. पण मागील वर्षी तिला दुखापतीमुळे तसेच कोरोना महामारीत खेळण्याच्या आव्हानामुळे तिला खेळता आले नव्हते. येथील पहिल्या सामन्यात तिने गोलुबिकवर तीन सेट्समध्ये विजय मिळविला होता, त्या विजयाने आत्मविश्वास वाढला असल्याचे ती म्हणाली. तिची पुढील लढत बेल्जियमच्या ग्रीट मिनेनशी होणार आहे.
पुरुष एकेरीत जागतिक दहाव्या मानांकित शापोव्हॅलोव्हने स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बाएनावर 7-6 (9-7), 6-3, 6-0 असा विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये त्याला अनियंत्रित चुकावर (19) आवर घालणे जमले नसले तरी त्याने 21 विजयी फटके मारले. टायब्रेकरमध्ये हा सेट जिंकल्यानंतर पुढचे दोन सेट्स त्याने झटपट संपवले. गेल्या वर्षी पेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत बाएनाने शापोव्हॅलोव्हवर विजय मिळविला होता. पण तिसऱया सेटवेळी त्याला शापोव्हॅलोव्हने एकही गुण मिळू दिला नाही. तिसऱया फेरीत शापोव्हॅलोव्हची लढत दक्षिण आफ्रिकेच्या लॉईड हॅरिसशी होईल.
जोकोविच विजयी
जागतिक अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचने कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकताना हॉलंडच्या टॅलन ग्रीकस्पूरवर 6-2, 6-3, 6-2 अशी मात केली. वर्षांत चारही ग्रँडस्लॅम पटकावणारा 52 वर्षातील पहिला टेनिसपटू होण्यासाठी त्याला आणखी पाच सामने जिंकावे लागणार आहेत. तिसऱया फेरीत त्याचा मुकाबला 2014 चा उपविजेता जपानच्या केई निशिकोरीशी होणार आहे. ‘ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणारा मी एकटाच खेळाडू नाही. अन्य काही खेळाडूंही ट्रॉफी उंचावण्यास आतुरलेले आहेत. मी फक्त प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतोय. त्याला कितपत यश मिळते ते पाहुयात,’ अशा भावना जोकोविचने नंतर व्यक्त केल्या.
निशिकोरीचा विजयासाठी संघर्ष
यापूर्वी 1969 मध्ये रॉड लेवरने कॅलेंडर ग्रँडस्लॅम पटकावला होता. जोकोविचने ही स्पर्धा जिंकल्यास त्याचे ते येथील चौथे जेतेपद ठरेल तर वैयक्तिक कारकिर्दीतील 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरेल. जपानच्या निशिकोरीने अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डवर 7-6 (7-3), 6-3, 6-7 (5-7), 2, 6-3 अशी पाच सेट्सच्या झुंजीत मात केली. निशिकोरीविरुद्ध जोकोविचचे रेकॉर्ड मात्र 17-2 असे खूपच सरस आहे. जोकोविचने त्याला मागील सलग सोळा सामन्यांत हरविलेले आहे. जर्मनीच्या ऑस्कर ओटेने तिसरी फेरी गाठताना अमेरिकेच्या डेनिस कुडलाचा 6-4, 6-4, 6-2 असा पराभव केला. पात्रता फेरीतून आलेला व तिसरी फेरी गाठलेला तो या स्पर्धेतील पाचवा खेळाडू आहे.