वृत्तसंस्था/ मेलबर्न
येथील मेलबर्न पार्कच्या टेनिस संकुलात सोमवारी 8 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 2021 च्या टेनिस हंगामातील ही पहिली ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा आहे. भारताची नवोदित महिला टेनिसपटू अंकिता रैनाचा या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये समावेश झाला आहे. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविणारी अंकिता रैना ही भारताची तिसरी महिला टेनिसपटू आहे.
ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या इतिहासामध्ये यापूर्वी भारताच्या निरूपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांनी प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविले होते. आता या यादीमध्ये अंकिता रैनाचा समावेश झाला आहे. सानिया मिर्झाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत महिलांच्या दुहेरीत आपला सहभाग दर्शविताना एकूण सहावेळा ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. 1998 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविणारी निरूपमा वैद्यनाथन ही भारताची पहिली टेनिसपटू ठरली होती. 28 वर्षीय अंकिता रैनाचे ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्याचे स्वप्न साकार झाले आहे. 2021 च्या टेनिस हंगामातील होणाऱया पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत भारताचे चार टेनिसपटू सहभागी होत आहेत. सुमीत नागल, अंकिता रैना, रोहन बोपण्णा आणि डी. शरण यांचा या स्पर्धेत समावेश राहणार आहे. बोपण्णा आणि शरण हे पुरूष दुहेरी तर सुमीत नागल पुरूष एकेरीत भाग घेतील. अंकिता रैना रोमानियाच्या मीहेलासमवेत दुहेरीत खेळणार आहे. त्यांचा पहिल्या फेरीतील सामना ऑलिव्हिया गॅडेकी व बेलिंडा वुलकॉक या ऑस्ट्रेलियन जोडीशी होणार आहे. सुमीत नागलचा पहिल्या फेरीतील सामना लिथुआनियाच्या बेरानकिस बरोबर होणार आहे.