मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
प्रतिनिधी /बेळगाव
अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांनी कोरोना काळात आरोग्य विभागाबरोबर रात्रंदिवस काम केले आहे. अशा काळामध्ये कोरोनाची लागण झाल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. तेव्हा किमान 50 लाख रुपये त्यांच्या कुटुंबीयांना द्यावेत यासह इतर मागण्यांसाठी सिटूच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांना देण्यात येणारे वेतन तुटपुंजे आहे. त्यामध्ये वाढ केलीच नाही. तेव्हा शिक्षिकांना किमान 21 हजार व मदतनीस यांना 15 हजार रुपये मासिक वेतन द्यावे. ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी त्यांनाही सामावून घ्यावे. निवृत्त झाल्यानंतर पेन्शन लागू करावी, अशी मागणीदेखील निवेदनात करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या तालुका अध्यक्षा मंदा नेवगी, संध्या कुलकर्णी, सुनीता ठोंबरे, सुरेखा कांबळे, सुरेखा नंदिहळ्ळी, लता जाधव, मिनाक्षी बडीगेर, मिनाक्षी दफडे यांच्यासह कार्यकर्त्या उपस्थित होत्या.