प्रतिनिधी /फोंडा
राज्यातील अंगणवाडी शिक्षिका व साहाय्यकांनी येत्या 23 डिसेंबरपासून पणजी येथील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पगारवाढ व अन्य दहा मागण्यांसाठी त्यांनी सरकारला 14 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपुष्टात आल्याने व सरकारकडून मागण्यांवर कुठलाच ठोस विचार न झाल्याने हे आंदोलन पुकारल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्ष देवयानी तामसे यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेती दिली. यावेळी संघटनेच्या सचिव विद्या नाईक, उपाध्यक्ष ज्योती सावर्डेकर, आरती मंडल, व दर्शन नाईक या उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविकांनी आपली जुनी संघटना रद्द करुन गोवा युनियन ऑफ अंगणवाडी कर्मचारी संघटना ही नवीन संघटना स्थापन केली आहे. अंगणवाडी शिक्षिका व साहाय्यकांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असून त्यांना योग्य वेतन तसेच वर्षागणिक वेतनवाढ मिळावी अशी त्यांची मागणी आहे. सध्या त्यांना पाच वर्षांतून एकदा वेतनवाढ केली जाते. शिवाय ज्येष्ठतेनुसार वेतनवाढ, आजारपणाची रजा, निवृत्तीनंतर मिळणाऱया पेन्शमध्ये वाढ अशा एकूण दहा मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालकांना तसे लेखी निवेदन सादर केल्याची माहिती तामसे यांनी दिली. सरकारने आमच्या तीन मागण्या पूर्ण केल्याचे सांगितले जाते. मात्र या नेमक्या कुठल्या मागण्या आहेत, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. संचालकांना भेटायला गेलेल्या काही अंगणवाडी शिक्षिकांवर नियमभंग केल्याचा ठपका ठेऊन कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून मागण्यांचा कुठलाच विचार केला जात नाही, उलट विविध मार्गांनी सतावणूक चालल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.