शहर वार्ताहर / राजापूर
शहरानजीकच्या धोपेश्वर येथे 4 वाहने जाळण्याच्या प्रकारानंतर आता तालुक्यातील दळे सडेवाडी येथे शनिवारी रात्री 12 च्या दरम्यान घरासमोर लावलेल्या दुचाकीला आग लावल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकी जळून भस्मसात झाली.
दळे सडेवाडी येथे राहणाऱया ग्रामसेविका सानप या बाहेरगावी गेल्याने त्यांच्या अंगणात दुचाकी झाकून ठेवण्यात आली होती. शनिवारी रात्री 12 च्या दरम्यान सानप यांच्या अंगणात आगीचे लोळ दिसल्याने शेजारील अनेकांनी घराकडे धाव घेतली, घरात कोणी नसल्याने घर बंद होते, मात्र अंगणात लावलेल्या दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात आले. यावेळी दुचाकीला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तत्पूर्वीच दुचाकी आगीत भस्मसात झाली होती. या घटनेची खबर त्वरित नाटे पोलीस स्थानकात दिली. नाटे पोलीस स्थानकाचे दीपक काळे आणि विकास चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. आगीत गाडी पूर्णपणे भस्मसात झाल्याचे पाहून सानप या बाहेरगावी गेल्याने शेजाऱयांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व घटनेची माहिती दिली.
दुचाकी जाणूनबुजून पेटवली तर नाही ना, असा संशय यावेळी उपस्थितांमधून व्यक्त केला जात होता. घराच्या अंगणात झाकून ठेवलेली गाडी कशी पेटू शकते, या बाबत आश्चर्य व्यक्त होत असून कोणी हे जाणीवपूर्वक कृत्य केले तर नाही ना, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.