तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
बार्शी येथील कृषी सहाय्यक अंगद घुगे यांच्या हत्या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून या कटातील घुगे यांच्या संशयित मुलाचे मित्र सहलीला गेले होते.त्या सहलीला गेलेल्या मित्रापैकी दोघे जण अद्यापही आपले मोबाइल बंद करुन फरार झाले आहेत. त्या फरार मित्रांचा या कटाशी काही संबंध आहे का हे पोलिस कसून तपासणी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लऊळ शिवारात कृषी सहाय्यक अंगद घुगे यांचा शुक्रवारी १७ रोजी खून झाल्याचे उघड झाले. त्याच दिवशी अटक करण्यात आलेल्या संशयित मुलाचे सात मित्र शिर्डी येथे सहलीला गेले होते. त्या सात मित्रापैकी दोघे जण घटना उघड झाल्याचे समजताच आपले मोबाइल बंद करुन अद्यापपर्यंत फरार असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. या सहलीतील इतर पाच जणांकडून फरार दोघाजणांबाबत काही माहिती मिळते का ते पोलिस कसून चौकशी करत आहेत. या फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.