संगमेश्वर-कळंबुशी खाचरवाडी येथील घटना
वार्ताहर/ संगमेश्वर
बाथरुममध्ये अंघोळ करताना विजेचा शॉक लागून संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी-खाचरवाडी येथे तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या दरम्यान घडली. मुकेश मोहन चव्हाण (35, कळंबुशी खाचरवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुकेश बाथरुममध्ये अंघोळ करत असताना टाकीतील पाणी संपले. यावेळी पंप सुरू करण्यासाठी विजेच्या बोर्डामध्ये पिन अडकवत असताना त्याला विजेचा धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अनिल उर्फ गणपत रत्नाकर चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पी. एस. शिंदे, मोंडे, देशमवार यांनी पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.