आमदार भास्कर जाधव : आंतरराष्ट्रीय शाळेच्या नुतन संकुलाचे उदघाटन
प्रतिनिधी / गुहागर
आपले गाव शैक्षणिकदृष्या पुढे गेले तर गावाचा विकास होईल, अशी दुरदृष्टी ठेवून शासनाने आणलेल्या नव्या धोरणाची संधी अंजनवेल ग्रामपंचायतीने घेतली आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आदर्श आंतरराष्ट्रीय शाळा अंजनवेलमध्ये असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले.
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलच्यावतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आदर्श आंतरराष्ट्रीय शाळेच्या नुतन शैक्षणिक संकुलाचा उदघाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. आमदार जाधव यांनी पुढे प्रत्येक तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारण्याचे जाहीर झाले. परंतु 9 पैकी 6 तालुक्यांचे नावच या यादीमध्ये नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ज्या शाळांची नावे या योजनेमध्ये नाहीत त्यांची नावे लवकरच जाहीर होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, सरपंच यशवंत बाईत यांनी गावाची प्रगती होईल हा दृष्टीकोन ठेवून शैक्षणिक काम केले जात असल्याचे सांगितले. तालुक्याचे क्रिडांगण अंजनवेलमध्ये होत असेल तर जागा देण्याचे काम आम्ही करू. मात्र नीधी आणण्याचे काम आमदार जाधवांनी करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, उपसरपंच आत्माराम मोरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, गटशिक्षणधिकारी वामन जगदाळे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता वैभव चौधरी, केंद्र प्रमुख अशोक गावणकर, माजी सभापती विठ्ठल भालेकर, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.