बोट मालकासह आठजण सुखरूप-6 जणपोहतआलेकिनाऱयावर
प्रतिनिधी/ गुहागर
मच्छीमारीसाठी अंजनवेल येथून समुद्रामध्ये जाणाऱया श्री गणेशकृपा या मच्छीमारी बोटीला खवळलेल्या लाटांच्या माऱयाने समुद्रामध्ये जलसमाधी मिळाली आहे. ही घटना रविवारी सकाळी 9.30 वाजता घडली असून बोटीमध्ये असलेले 8 जण सुखरूप किनाऱयावर पोहोचले आहेत. यातील सहाजण पोहत किनाऱयावर आले तर दोघांना दुसऱया बोटीने वाचवण्यात यश आले. यात बोटीला दणका बसल्याने बोटीचे सुमारे 25 लाखाचे नुकसान झाले.
तालुक्यातील धोपावे येथील ज्ञानेश्वर भाग्या भोरजी यांच्या मालकीची ती बोट होती. ही बोट नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी 7.30 च्या दरम्यान अंजनवेल येथून राजेश चंद्रकांत भोरजी (32, धोपावे), उदय बजरंग दाभोळकर (40, दाभोळ), रोहिदास हरिश्चंद्र भोरजी (56, धोपावे), जयदास शंकर भाटकर (42, ओणी-दापोली), तुकाराम विठु पालशेतकर (60, दोभाळ-डोरसई), जगन्नाथ विश्राम पवार (55, विसापूर-कारूळ), प्रणीत देवराम दाभोळकर (35, ओणी- दापोली) या 7 खलाशांना घेऊन समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी निघाली.
दाभोळ खाडीच्या मुखाजवळ सँडबारमुळे मोठय़ा प्रमाणात समुद्राच्या लाटा तयार होत असतात. अंजनवेलच्या लाईट हाऊससमोरील समुद्रामध्ये खवळलेल्या समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या माऱयाने बोट हेलकावे घेऊ लागली. लाटांचे पाणी बोटीमध्ये शिरल्याने बोटीतील इंजिन बंद पडले. परिणामी बोटीला वाचवता आले नाही. बोटीत पाणी शिरल्याने बोट बुडत असताना बोटीत असलेल्या मालकासह 8जणांनी खवळलेल्या समुद्रात उडय़ा घेतल्या. बोटीतील मिळेल ते साहित्य घेऊन यातील 6जणांनी पोहून गोपाळगड किल्ल्याजवळील किनारा गाठण्याचे प्रयत्न सुरू केले. दोघांनी बोटीच्या फळीच्या सहाय्याने पाण्यातच पोहत राहिले. 6 जण पोहत अंजनवेल-गोपाळगड किल्ल्याजवळ पोहोचले, तर या दोघांना वाचवण्यासाठी ‘शैलोबा पडसाद’ या समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जात असलेल्या मच्छीमारी बोटीशी अंजनवेलवासीयांनी मोबाईलवरून संपर्क साधला.
यानंतर शैलोबा पडसाद ही बोट खलाशांना वाचवण्यासाठी माघारी फिरली. या बोटीवर तांडेल म्हणून बोटमालक ज्ञानेश्वर भोरजी यांचा भाऊ आहे. अजस्त्र लाटांच्या माऱयामध्येही या बोटीने त्या दोघांना आपल्या बोटीवर सुखरूप घेतले. तसेच आठहीजणांना किनाऱयावर सुखरूप आणले. त्यानंतर इतर बोटींच्या सहाय्याने बुडालेली बोट महत्प्रयासाने किनाऱयावर आणण्यात आली. बोटीला दणका बसल्याने बोटीचे सुमारे 25 लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती कळताच गुहागरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, राजू कांबळे, आनंद पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची गुहागर पोलीस स्थानकात नोंद केली आहे.