नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चालू वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण शनिवारी होते. संपूर्ण सूर्यग्रहणाचे दृश्य फक्त अटलांटिकात दिसले. तसेच सेंट हेलेना, नामिबिया, लेसेथो, दक्षिण आफ्रिका, दक्षिण जॉर्जिया, सँडविच बेट, क्रोझेट बेट, फॉकलंड बेटे, चिली, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे आंशिक सूर्यग्रहण दिसले. हे सूर्यग्रहण भारतातून दिसू शकले नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.59 च्या सुमारास ग्रहणाला सुरुवात झाली होती. संपूर्ण सूर्यग्रहण दुपारी 12.30 वाजता सुरू झाले. त्यावेळी सूर्याचा बराचसा भाग चंद्राच्या मागे झाकोळला गेला होता. 1 वाजून 10 मिनिटांनी सूर्य चंद्राने पूर्णपणे झाकला गेल्याची माहिती खगोल अभ्यासकांकडून देण्यात आली.