ऑनलाईन टीम / बेंगळूर :
अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय याचे आज पहाटे बेंगळूरमध्ये कर्करोगाने निधन झाले. तो 68 वर्षांचा होता. काही वर्षांपूर्वी राय याने गुन्हेगारी सोडल्याचा दावा केला होता. तर मृत्यूपूर्वी शेवटचा श्वास घेताना त्याने आपण खरे देशभक्त असल्याचे बोलल्याचे सांगण्यात येत आहे.
मुथप्पा राय हा आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला सुशिक्षित डॉन होता. पीएसयू विजया बँकेत अधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. मात्र, 80 च्या दशकात राय बेंगळूरच्या अंडरवर्ल्डशी संपर्कात आला.
1990 मध्ये तत्कालीन बेंगळूरचे खासदार जयराज यांच्या हत्येनंतर तो एका रात्रीत माफिया डॉन बनला. त्यानंतर राय दुबईतील डी कंपनीचे कामकाज पाहणाऱ्या शरद शेट्टीच्या संपर्कात आला. त्यानंतर तो क्रिकेट मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या व्यवसायाची जबाबदारी पहात होता. शेट्टीने त्याला अनेक वर्षे दुबईत ठेवले होते. 1994 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे तरूण नेते जयंत राय यांना पुत्तूर येथे त्यांच्याच कार्यालयात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. तेव्हापासून मुथप्पाने बंगळुरुमधूनच आपला कारभार पाहण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने 30 वर्ष बंगलोरवर राज्य केले.