ऑनलाईन टीम / सातारा :
भारतातून फरार झालेला अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. एफबीआयच्या इनपुट्सनंतर मुंबई पोलिसांनी फिलिपिन्सच्या पॅरानॅक सिटीत पुजारीच्या मुसक्या आवळल्या. आता फिलिपिन्समधून त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सुरेश पुजारी हा अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करत होता. 2012 मध्ये रवी पुजारीसोबत वाद झाल्यानंतर त्याने नवी टीम तयार केली होती. खंडणीकरता तो नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातील डान्सबार मालकांना नियमित कॉल करत असे. ज्यांनी खंडणी जमा केली नाही त्यांच्यावर तो गोळय़ा झाडत असे. 2018 मधील भिवंडी फायरिंग प्रकरणात ठाणे खंडणीवरोधी पथकाने दाखल केलेल्या प्रकरणात पुजारीचं एफआयरमध्ये नाव आहे. मुंबई पोलिसांप्रमाणेच एफबीआय आणि सीबीआयच्या तो रडारवर होता. गेल्या अनेक दिवसांपासून महत्त्वाच्या तपास यंत्रणा सुरेश पुजारीच्या मागावर होत्या. गेल्या महिन्यात 21 सप्टेंबर रोजी सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पावलं उचलण्यात आली. अखेर त्याला फिलिपिन्सच्या पॅरानॅक सिटीतून त्याला अटक करण्यात आली.