अमेझॉनसह अनेक कंपन्या शर्यतीत : भारतीय कंपन्यांकडून 22 तर विदेशी कंपन्यांचे 4 प्रस्ताव प्राप्त
वृत्तसंस्था / बेंगळूर
दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन आणि वनवेब समवेत अनेक देशविदेशातील कंपन्यांनी भारतीय अंतराळ क्षेत्रात स्वारस्य दर्शविले आहे. सरकारने काही महिन्यांपूर्वी देशाचे अंतराळक्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार भारतीय कंपन्यांकडून 22 तर विदेशी कंपन्यांचे 4 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नव्याने स्थापन अंतराळ नियामक इन-एसपीएसीई या प्रस्तावांची समीक्षा
करत आहे.
जेफ बेजोस यांची कंपनी अमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) आणि भारती समुहाची गुंतवणूक असलेली ब्रिटनची कंपनी वन वेबनेही भारताच्या अंतराळ क्षेत्राकरिता उत्सुकता दर्शविला आहे.
इन-एसपीएसीई (इंडियन स्पेस प्रमोशन ऍण्ड ऍथोरायजेशन सेंटर) ला प्राप्त प्रस्तावांमध्ये ग्राउंड स्टेशनसाठी परवानगी, उपग्रहनिर्मिती आणि प्रक्षेपणासाठी सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन्सची निर्मिती, प्रक्षेपक तयार करणे व ऍप्लिकेशन्स उपलब्ध करविण्याचा मुद्दा सामील आहे.
अनेक भारतीय कंपन्या योग्यपद्धतीने पुढे येत असून हा प्रकार उत्साहवर्धक तसेच पंतप्रधानांच्या व्हिजननुसार आहे. यात एल ऍण्ड टी आणि भारती समूह तसेच स्टार्टअप कंपन्या सामील आहेत. अमेझॉनसारख्या विदेशी कंपन्यांनी उत्सुकता दर्शविल्याने भारताला जागतिक अंतराळ हब होण्यास मदत मिळणार असल्याचे विधान अंतराळ विभागाचे सचिव के. सिवन यांनी
केले आहे.
भारतीय कंपन्यांही आघाडीवर
टाटा समुहाची कंपनी नेल्कोने लो अर्थ ऑर्बिट नेटवर्क सर्व्हिसेससाठी सहकार्य मागितले आहे. तर एल ऍण्ड टी छोटय़ा उपग्रहांसाठी प्रक्षेपक निर्मितीत भूमिका पार पाडू इच्छित आहे. अनेक स्टार्टअप कंपन्यांनी अंतराळआधारित ऍप्लिकेशन्स, उपग्रहनिर्मिती, प्रक्षेपण व प्रक्षेपकांचा विकासासाठी अनुमती मागितली आहे.
प्रस्तावाचे स्वरुप
एडब्ल्यूएसने जूनमध्ये एअरोस्पेस ऍण्ड सॅटेलाइट सोल्युशन्स ही नवी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीने खासगी अंतराळ व्यवसायासाठी अनुमती मागितली आहे. यात ग्राउंड स्टेशन स्थापन करणे आणि उपग्रहआधारित सेवा पुरविणे सामील आहे. याचप्रकारे वन वेबने स्मॉल सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन्सची निर्मिती आणि सेवांसाठी अनुमती मागितली आहे. युएईची कंपनी आर्चेरॉन ग्रुपला छोटय़ा उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी साहाय्य हवे आहे. तर नॉर्वेच्या कोंगबर्ग सॅटेलाइट सर्व्हिसेस (केसॅट) या कंपनीची ग्राउंड स्टेशन तयार करण्याची इच्छा आहे.