अंतराळवीरांसाठी भारताच्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीने (डीएफआरएल) विशेष खाद्यपदार्थ तयार केले आहेत. हे भारतीय खाद्यपदार्थ पौष्टिक आणि आरोग्यदायी आहेत. या खाद्यपदार्थांमुळे अंतराळवीरांना ऊर्जा प्राप्त होणार आहे. डीएफआरएलने हे खाद्यपदार्थ डिफेन्स एक्स्पोमध्ये सादर केले आहेत.
अंतराळवीरांना भोजनासह टेस्ट मेकर मसाल्याचे पाकिटही दिले जाणार आहे. गगनयान मोहिमेत अंतराळवीरांना 60 किलोग्रॅम धान्य आणि 100 लिटर पाणीही दिले जाईल. या खाद्यपदार्थांची आता इस्रोकडून तपासणी केली जाणार आहे. या खाद्यपदार्थांना विशेष डिस्पोजल पॅकेजिंग मटेरियलचे वेष्टन देण्यात आले आहे. अंतराळवीरांना पाकिटबंद खाद्यपदार्थांसह न्यूट्रीशन बार, बदाम इत्यादीही पुरविले जाणार आहेत.
सॉफ्टी, चमच्यांची निर्मिती
डीएफआरएलचे हे खाद्यपदार्थ वर्षभर टिकणार आहेत. याच्या वेष्टन आणि निर्मितीकरता विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. चटणीसाठी विशेष प्रकारची पावडर तयार करण्यात आली आहे. अंतराळवीरांना गरजेनुरुप भोजन दिले जाणार आहे. सॉफ्टी कटोरी आणि चमच्यांची निर्मिती करण्यात आली असून भोजनानंतर त्यांचेही सेवन करता येईल.
ब्रेडचा वापर टाळला
अंतराळात बेडचे तुकडे पसरू शकत असल्याने त्याची निवड करण्यात आलेली नाही. अंतराळवीरांना किती कॅलरीचा आहार द्यावा याची काळजी खाद्यपदार्थ निर्मितीवेळी करण्यात आला आहे. एग रोल, व्हेज रोल, मुगडाळीचा हलवा यासह कित्येक खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर एक फूड हीटरही अंतराळात पाठविला जाणार आहे.