स्पेसएक्सचे कार्गो ड्रगन झेपावले : आयएसएसमध्ये पोहोचणार
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिको
स्पेसएक्स या अमेरिकेतील अंतराळ कंपनीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या स्वतःच्या 4 अंतराळवीरांना पृथ्वीवरून नववर्षाची भेट पाठविली आहे. कंपनीच्या कार्गो ड्रगन कॅप्सूल अंतराळयानाद्वारे भेटवस्तू रवाना करण्यात आल्या आहेत. हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) पोहोचणार असून अंतराळवीरांना त्यांची भेटवस्तू प्रदान करणार आहे. रविवार रात्री उशिरा नासाच्या केनेडी अंतराळ केंद्रातून फाल्कन 9 प्रक्षेपकाद्वारे अंतराळयान झेपावले आहे.
स्पेसएक्सने एखाद्या अंतराळयानासोबत दोन ड्रगन कॅप्सूल पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीच्या या कार्गो अंतराळयानाचा आकार पूर्वीच्या तुलनेत मोठा आहे. याच्या माध्यमातून काही अन्य आवश्यक सामग्रीही पाठविण्यात आली आहे.
स्पेसएक्सचे 4 अंतराळवीर 13 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले होते. ही मोहीम स्पेसएक्सच्या क्रू ड्रगन अंतराळयानाद्वारे पूर्ण करण्यात आली होती. ड्रगनचे पहिले मोहिमात्मक प्रक्षेपण होते. अंतराळ स्थानकात पोहोचणाऱया अमेरिकेच्या अंतराळवीरांमध्ये मायकल हॉपकिन्स, विक्टर ग्लोवर आणि शॅनन वॉकर यांचा समावेश होता. जपानचे अंतराळवीर सोइची नोगुची देखील फ्लोरिडाच्या केनेडी अंतराळ केंद्रातून रवाना झाले होते. पुढील 5 महिन्यांपर्यंत सर्व अंतराळवीर तेथेच राहणार आहेत.