एलन मस्क यांच्या कंपनीने रचला इतिहास : 4 जणांना रॉकेटने अंतराळात पाठविले
वृत्तसंस्था /फ्लोरिडा
अमेरिकेतील उद्योजक एलन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीने गुरुवारी इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.33 वाजता पहिल्यांदाच 4 सर्वसामान्य लोकांना अंतराळात पाठविले आहे. नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस रिसर्च सेंटरमधून फॉल्कन-9 रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण झाले. प्रक्षेपणाच्या 12 मिनिटांनी ड्रगन कॅप्सूल रॉकेटपासून विभक्त झाला.
हा कॅप्सूल 35 मैल म्हणजेच सुमारे 575 किलोमीटरच्या उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत तीन दिवस प्रदक्षिणा घालणार आहे. या मोहिमेला ‘इन्स्पिरेशन 4’ नाव देण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश अमेरिकेच्या टॅनेसी येथील सेंट जूड चिल्ड्रन रिसर्च हॉस्पिटलासाठी निधी जमविणे आहे. मोहिमेचे नेतृत्व करणारे इसाकमॅन याच्या माध्यमातून 20 कोटी डॉलर्स जमवू पाहत आहेत. यातील निम्मी रक्कम ते स्वतःच देणार आहेत. या मोहिमेद्वारे कर्करोगाबद्दलही जागरुकता वाढविली जाईल. मोहिमेच्या एक सदस्य सेंट जूड चिल्ड्रन रिसर्च हॉस्पिटलमधील फिजिशियन असिस्टेंट व कर्करोगावर मात करणाऱया आहेत.
खर्चाचा खुलासा नाही
या पूर्ण अंतराळप्रवासाचा खर्च इसाकमॅन उचलत आहेत. मोहिमेच्या एकूण खर्चाचा अद्याप कुठलाच खुलासा करण्यात आलेला नाही. पण या मोहिमेसाठी स्पेसएक्सला इसाकमॅन यांनी मोठी रक्कम दिली असल्याचे मानले जात आहे. मोहीम पूर्ण झाल्यावर इसाकमॅन खर्चाचा तपशील उघड करू शकतात.
मोहिमेतील सदस्य
- जेयर्ड इसाकमॅन : मोहिमेची पूर्ण धुरा इसाकमॅन यांच्याकडे आहे. 38 वर्षीय इसाकमॅन ‘शिफ्ट4पेमेंट’ नावाच्या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी ही कंपनी सुरू केली होती आणि आज ते अब्जाधीश आहेत. याचबरोबर ते प्रोफेशनल वैमानिक आहेत. स्वतःच्या कंपनीद्वारे ते अमेरिकेच्या वायुदलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देतात.
- हेयली आर्केनो : हेयली यांनी कर्करोगावर मात केली आहे. 29 वर्षीय हेयली अंतराळात जाणाऱया सर्वात कमी वयाच्या अमेरिकन नागरिक आहेत. त्यांना हाडांचा कर्करोग झाला होता आणि त्यांच्यावर सेंट जूड रुग्णालयात उपचार झाले होते. मोहिमेत हेयली यांना वैद्यकीय अधिकाऱयाची जबाबदारी मिळाली आहे.
- शॉन प्रोक्टर : 51 वर्षीय प्रोक्टर एरिझोनाच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. प्रोक्टर यांच्या वडिलांनी अपोलो मोहिमेदरम्यान नासासोबत काम केले होते. तसेच प्रोक्टर यांनीही अनेकदा नासाच्या अंतराळ कार्यक्रमात भाग घेतला आहे.
- क्रिस सेम्ब्रोस्की : 42 वर्षीय क्रिस हे अमेरिकेच्या वायुदलात वैमानिक राहिले आहेत. तसेच त्यांनी इराक युद्धात भाग घेतला होता. क्रिस सध्या एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन कंपनी लॉकहीड मार्टीनसोबत काम करत आहेत. 575 किमी अंतरावरील पृथ्वीच्या कक्षेत 3 दिवस वास्तव्य करणार
मोहिमेची वैशिष्टय़े…
- पृथ्वीच्या कक्षेत जाणारे हे पहिले नॉन प्रोफेशनल एस्ट्रोनॉट्सचे पथक आहे. या मोहिमेतील चारही सदस्य यापूर्वी कधीच अंतराळात गेले नव्हते.
- यापूर्वी ब्ल्यू ओरिजिन आणि व्हर्जिन स्पेस शिपनेही खासगी अंतराळ पर्यटनाची सुरुवात करत उड्डाण केले होते. पण त्यांचे यान एज ऑफ स्पेसपर्यंतच गेले होते.
- दोन्ही कंपन्यांचे यान अंतराळात पोहोचले आणि काही मिनिटात पृथ्वीवर परतले. तर ही मोहीम तीन दिवसांची असणार आहे.
- या अंतराळयानात दोन प्रशिक्षित वैमानिक आहेत, पण अंतराळयान संचालनात त्यांची कुठलीच भूमिका नाही.