गोवा बोर्डातर्फे शाळांना मार्गदर्शक तत्वे जारी
प्रतिनिधी / पणजी
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करणारी योजना आणि तिचा मसुदा आखला आहे. शाळांमधील परीक्षांच्या गुणांनुसार अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे तो निकाल देण्यात येणार आहे. या निकालाच्या धोरणाची माहिती बोर्डातर्फे सर्व शाळांना पाठवण्यात आली आहे. त्यात काही मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत.
त्या धोरणानुसार प्रत्येक शाळेने निकाल समिती नेमण्याची सूचना करण्यात आली असून त्यात मुख्याध्यापकासह 8 शिक्षकांचा समावेश करावा, असे म्हटले आहे. त्यात शेजारील शाळांमधील दोन शिक्षकांना समाविष्ट करावे, अशी अट घालण्यात आली आहे.
बोर्डाने तयार केलेला निकाल एखाद्या विद्यार्थ्यास मान्य नसेल तर त्याने पुरवणी परीक्षा द्यावी, असा पर्याय देण्यात आला आहे. बोर्डाच्या धोरणानुसार जर एखाद्या शाळेने निकाल दिला नाही तर त्या शाळेचा निकाल राखून ठेवण्याचा इशारा धोरणातून देण्यात आला आहे.
सर्व शाळांचे अंतर्गत गुण बोर्डाच्या पोर्टलवर सादर करण्यात आले आहेत. ते अंतर्गत गुण 20 असतात तर 80 गुण बोर्डाच्यापरीक्षेत असतात असे मिळून एकुण प्रत्येक विषयाचे 100 गुण असतात. आता बोर्डाची परीक्षा रद्द झाल्याने 80 गुणही शाळांनाच द्यावे लागणार असून ते काम शाळांच्या निकाल समितीला करावे लागणार आहे. शाळांनी दिलेले गुण कोणत्या आधारावर दिले त्याचा पुरावा नोंद करुन ठेवावा. कोणीतरी हरकत घेतली तर ते पुरावे दाखवण्याची गरज पडू शकते. शाळांना देखील स्वंतत्र परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली असून ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देता येणे शक्य नाही किंवा अंतर्गत मुल्यमापन ज्यांचे होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना वेगळी परीक्षा (पुरवणी) देण्याची सूचना धोरणातून करण्यात आली आहे.