ऐतिहासिक कामगिरीची नोंद – निफ्टीही मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात आठवडय़ाच्या अंतिम सत्रात शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या लिलावाच्या प्रभावामुळे बीएसई सेन्सेक्स 163 अंकांनी मजबूत होत प्रथमच 60,000 चा टप्पा प्राप्त करत सेन्सेक्स निर्देशांकाने नवी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. यामध्ये प्रामुख्याने एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि एशियन पेन्ट्सच्या मजबूत समभागांचा फायदा भारतीय बाजाराला झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 163.11 अंकांसह 0.27 टक्क्यांनी मजबूत होत निर्देशांकाने 60,048.47 ची उंची प्राप्त करत नवा विक्रम नोंदवला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात दिवसअखेर निफ्टी 30.25 अंकांच्या मदतीने 0.17 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 17,853.20 अंकांचा विक्रम प्राप्त केला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
सेन्सेक्सला1,000 अंकांपासून ते 60,000 अंकांचा ऐतिहासिक टप्पा प्राप्त करण्यास जवळपास 31 वर्षांच्यापेक्षा अधिकचा कालावधी लागला आहे. मानक निर्देशांक 25 जुलै 1990 रोजी 1000 वर होता. जवळपास 25 वर्षामध्ये म्हणजे मार्च 2015 मध्ये 30,000 ची उंची सेन्सेक्सने गाठली होती. त्यानंतर 30,000 ते 60,000 चा प्रवास करण्यास 6 वर्षापेक्षा कमी कालावधी लागला आहे.
‘सेन्सेक्स’ने शुक्रवारी 60,000चा टप्पा प्राप्त केला आहे. ही भारताच्या विकासाची दिशा दर्शवत असल्याचे संकेत आहेत. यासोबतच भारतात कोरोनाची महामारी आली असतानाही त्याला समर्थपणे टक्कर देत भारत सावरत ही लक्षणीय कामगिरी केली आहे.’ असे मत बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांनी व्यक्त केले आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्चे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. यासोबतच महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, मारुती सुझुकी आणि इन्फोसिस यांचे समभाग प्रामुख्याने मजबूत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, स्टेट बँक, ऍक्सिस बँक, आयटीसी, एनटीपीसी आणि बजाज फायनान्सचे समभाग घसरणीत राहिले आहेत.
देशातील कंपन्यांची मदत
दिग्गज कंपन्यांपैकी शुक्रवारी प्रामुख्याने देशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांची मोठी मदत भारतीय बाजाराला झाली आहे. दुसरीकडे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचीही मदत काही प्रमाणात मिळाली असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.