कमी लाकडे टाकून जादा पैसे घेण्याचा प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
अंत्यविधीची प्रक्रिया कमी खर्चात व्हावी या दृष्टीने बसविण्यात आलेली डिझेलवर चालणारी शवदाहिनी निकृष्ट दर्जाची बनली आहे. अशातच लाकडासाठी तीन ते चार हजार रुपये वसूल करण्याचा सपाटा सदाशिवनगर स्मशानभूमीत चालविण्यात आला आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना लुटण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱयांना आवरा अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
सध्या कोरोनामुळे बळींची संख्या वाढली आहे. रोज 15 ते 20 अंत्यविधी सदाशिवनगर स्मशानभूमीत करण्यात येत आहेत. अंत्यविधीचा खर्च कमी प्रमाणात व्हावा याकरिता महानगरपालिकेच्यावतीने सदाशिवनगर स्मशानभूमीत डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसविली आहे. मात्र या शवदाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अंत्यविधीसाठी चार तासांचा अवधी लागत आहे. तसेच प्रत्येक अंत्यविधीसाठी 40 लिटरहून अधिक डिझेल लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही शवदाहिनी म्हणजे पांढरा हत्ती बनली आहे. या शवदाहिनामुळे अंत्यविधीसाठी केवळ 1500 ते 2000 रुपये खर्च येईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र हा खर्च डोईजड होत आहे. त्यामुळे सदर शवदाहिनीवर अंत्यविधी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
अशातच अंत्यविधी करण्यासाठी येणाऱया नागरिकांकडून लाकडे, पीपीई कीट व अन्य कारणास्तव मोठय़ा प्रमाणात पैशाची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. अंत्यविधीसाठी 3 ते 4 क्विंटल लाकडे खरेदी करण्यात येतात. पण नातेवाईक अंत्यविधीसाठी येण्यापूर्वीच स्मशानभूमीत लाकडे टाकण्यात येतात. प्रत्यक्षात दोन-अडीच क्विंटल लाकडे टाकून तीन ते चार क्विंटलचे पैसे वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांनी स्मशानमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱयांकडे विचारणा केली असता चार क्विंटल लाकडे असल्याचे सांगून लाकूडवाल्याला पैसे द्या असे सांगण्यात येते. नातेवाईकांच्या उपस्थितीत लाकडे टाकण्याऐवजी ते येण्यापूर्वीच स्मशानभूमीत लाकडे टाकण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे लाकूड विपेते व मनपा कर्मचाऱयांमध्ये संधान असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. कोरोनावरील व अन्य आजारांवरील औषधोपचार घेण्यासाठी पैशाची टंचाई भासत आहे. अशातच मृत व्यक्तांच्या नातेवाईकांकडून लाकडासाठी जादा पैसे वसूल करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.