पालिकेच्या आरोग्य अधिकाऱयाचे कारनामे उघडकीस
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे माणूस माणसाला ओळखेना झाला आहे. चार दिवस सुखात चांगलं काम करून जगायचे सोडलं आणि चुकीचे काम करून पैसे मिळवणारे अनेकजण या कोरोनाच्या संकटात दिसू लागले आहेत. असाच प्रकार सातारा पालिकेतल्या आरोग्य विभाग प्रमुखांच्या बाबतीत घडत असल्याची बाब माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या अधिकाऱयांवर तेंडसुख घेतले. त्यामुळे त्याचे तोंडावरचे ‘सु हास्य’ पळुन गेले. चक्क अंत्यसंस्कार करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जयेंद्र चव्हाण यांना समजताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्या अधिकाऱयांची मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे पालिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे.
कोरोना काळात माणसांना लुटणारे अनेक माणसंच दिसू लागली आहेत. माणूस म्हणून माणसाला मदत करायची भावना बाजूला ठेवून आपला खिसा कसा गरम होईल याकडे पाहिले जात आहे. असाच प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातारा पालिकेत आरोग्य विभागात सुरू आहे. सुरू असलेल्या प्रकाराची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्याचा विस्फोट बुधवारी झाला.
जेव्हा अभिनेत्री आशालता यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उशीर करण्यात आल्याची बाब माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्यापर्यंत पोहचली तेव्हा ते संतापले. आशालता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार लवकर करा, अशी विनंती अभिनेत्री अलका कुबल या करत होत्या. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुखाने तेथे अगोदर साई अमृत हॉस्पिटलमध्ये जे कोरोनाने मृत झाले होते त्यांचे अंत्यसंस्कार केले. आशालता यांच्यावर अंत्यसंस्कार करून अभिनेत्री अलका कुबल यांना मुंबईला जायला उशीर झाला. मात्र, दुसऱया दिवशी एक तक्रार पुन्हा नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्याकडे आली की लगेच अंत्यसंस्कार करायचे असले की पालिकेच्या आरोग्य विभागातल्या अधिकाऱयास दहा हजार रुपये द्यावे लागतात. याची जेव्हा चव्हाण यांनी पडताळणी केली तेव्हा वास्तव खूप भयान असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या अधिकाऱयास चांगले शाब्दिक फटके देत सुनावले. आणि हा किळसवाणा प्रकार थांबवा अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल असे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे विनंती केली.
अंत्यसंस्कार करणाऱया कर्मचाऱयांचे मानधन रखडवले
दरम्यान, जे अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी आहेत त्यांचे गेले तीन महिने मानधन आरोग्य विभागाच्या या अधिकाऱयाने दिले नसल्याची बाब ही चव्हाण यांना समजली. त्यावर जयेंद्र चव्हाण म्हणाले, सभापती सौ. घोरपडे यांना बोलून त्या कर्मचाऱयांचे मानधन काढायला सांगतो पण त्या विभाग प्रमुखाचा चाललेला प्रकार थांबला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.