पुढील 24 तासांमध्ये तीव्र होणार चक्रीवादळ : अंदमान-निकोबार प्रशासनाकडून हेल्पलाईन जारी
वृत्तसंस्था / पोर्ट ब्लेअर
2022 मधील पहिले चक्रीवादळ ‘असनी’ने अंदमान-निकोबार बेटसमुहाला रविवारी धडक दिली आहे. किनारी भागांमध्ये जोरदार वाऱयांसह मुसळधार पाऊस पडत आहे. स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर आवश्यक व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. किनारी क्षेत्रांमध्ये राहणाऱया लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले आहे. एका बेटावरून दुसऱया बेटादरम्यान चालणारी बोटसेवा रोखण्यात आली आहे. चेन्नई आणि विशाखापट्टणम् दरम्यानची शिपिंग सर्व्हिसही बंद करण्यात आली आहे. समुद्रात न जाण्याचा सल्ला मच्छीमारांना देण्यात आला आहे.
दक्षिण-पूर्व बंगालचे उपसागर आणि त्याला लागून असलेल्या दक्षिण अंदमान सागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. तो आता पूर्वोत्तरच्या दिशेने सरकला आहे. सोमवारी हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. निकोबार बेटसमुहामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
22 मार्चपर्यंत बंगालचे उपसागर, अंदमान सागर आणि अंदमान-निकोबार बेटसमुहाच्या भागांमध्ये न जाण्याची सूचना हवामान विभागाने मच्छीमारांना केली आहे. असनी चक्रीवादळाचा प्रभाव पाहता अंदमान-निकोबारचे मुख्य सचिव जितेंद्र नारायण यांनी 22 मार्चपर्यंत सर्व पर्यटन हालचालींवर बंदी घातली आहे. पोर्ट ब्लेअरवरून समुद्रीमार्गाने नजीकच्या बेटांवर ये-जा करण्यासाठीची सेवा रोखण्यात आली आहे.
तटरक्षक दलातर्फे उपाययोजना हाती
अंदमानमध्ये हवामान बिघडण्याची शक्यता पाहता भारतीय तटरक्षक दलाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बाहेर आणण्याचे कार्य केले जात आहे. अंदमान-निकोबार प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.