कॅलिफोर्निया / वृत्तसंस्था
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. या गोळीबारात 12 जण जखमीही झाले आहेत. कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रामेंटोमध्ये ही घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्यांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुष आहेत, असे पोलीसप्रमुख कॅथी लेस्टर यांनी पत्रकारांना सांगितले. दोन हल्लेखोरांनी हा गोळीबार केला असून ते फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोळीबाराच्या घटनेतील काही क्षण सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झाले असून त्याच्या अनुषंगाने हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. या गोळीबारात एकंदर बारा जण गोळय़ा लागल्यामुळे जखमी झाले असून त्यापैकी किमान चार जण गंभीर जखमी झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी किंवा गोळीबाराचे रेकॉर्डिंग असलेल्यांना पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिकाऱयांनी केले आहे. चालू वर्षातील अमेरिकेतील अंदाधुंद गोळीबाराची ही तिसरी मोठी घटना आहे.