माहेश्वरी अंधशाळेकडून गेल्या कित्येक वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना या ब्रेल लिपीव्दारे ज्ञानाचे अमृत पाजवून घडविले जात आहे. शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या 130 हून अधिक विद्यार्थ्यांना बेल लिपीव्दारे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष करून शाळेतील चार अंध शिक्षक या शाळेत शिकवत असल्यामुळे शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांना वेगळे समाधान मिळत आहे.
विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबर आकडेमोड,संगीत व इतर गोष्टी शिकविण्यासाठी विशेष वर्ग तयार करून आकर्षक सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. याव्दारे विद्यार्थ्यांना विषय सोपा करून समजून सांगण्यास मदत होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. या अंधशाळेने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडविले आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांना खिळय़ांच्या माध्यमातून ब्रेल लिपीकडे वळविले जाते.
लई ब्रेल यांनी अंध व्यक्तींसाठी स्पर्शाच्या सहाय्याने वाचनाची पद्धत विकसित केली आहे. ज्ञान ग्रहण करून सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे तेदेखील परीक्षा देऊ शकतात. या लिपीविषयी अधिक माहिती यावेळी शिक्षकांनी दिली. शासनाने अंध मतदारांसाठी विशेष करून ईव्हीएम यंत्राच्या बाजूला ब्रेल लिपीतील मतपत्रिकेची सोय केली आहे. त्यामुळे अंध व्यक्तींना मतदान करणे सोयीस्कर होत आहे, असेही ते म्हणाले.
अनिता गावडे (मुख्याध्यापिका)
आज वापरली जाणारी ब्रेल लिपी सोपी व सोयीची असल्यामुळे लाखो अंधांच्या काळोख्या जगात ज्ञानाचा प्रकाश उगवला आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचा वापर करून प्रशिक्षण दिले जाते. पहिलीत प्रवेश घेतल्यापासून ही सांकेतिक भाषा शिकविली जाते. सुरूवातीच्या काळात विद्यार्थ्यांना थोडा वेळ लागतो मात्र एकदा ही लिपी अवगत झाली की विद्यार्थी ही लिपी विसरत नाहीत. याव्दारेच अध्यापन व अध्ययन सुरळीत चालू आहे.