प्रतिनिधी / कोल्हापूर
एकतीस वर्षांपूर्वी तयार केलेली करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती मंगळवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्त केली. पारंपरिक वाद्याच्या गजरात मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी अंबाबाईच्या या मूर्तीची केलेली सालंकृत पूजा लक्षवेधी ठरली. भक्तिपूर्ण वातावरणात देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी अंबाबाईची मूर्ती सुपूर्त केली.
सराफ संघाच्या कार्यालयाजवळील चौकात फुलांनी सजवलेल्या टॅक्टरमध्ये सायंकाळी 51 किलो चांदीची अंबाबाईची मूर्ती विराजमान करण्यात आली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेला सुरूवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह सराफ संघाचे सर्व संचालक उपस्थित होते.
अंबा माता की जय, अंबा की जय बोलो, दुर्गा की जय बोलो, असा गजर करत शोभायात्रा मार्गस्थ झाली. गुजरी, भाऊसिंगजी रोड, जुना राजवाडा, एम. एल. जी. हायस्कूल, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, जोतिबा रोड, या मार्गाने घाटी दरवाजाजवळ आली. यानंतर सराफ संघाच्या पदाधिकाऱयांनी अंबाबाई मंदिरात नेली. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सर्वांचे स्वागत करून मूर्ती स्वीकारली. कोल्हापूर सराफ संघाने 31 वर्षापूर्वी पुढाकार घेत, लोकसहभागातून 80 किलो चांदी संकलीत केली होती. त्यापैकी 51 किलो चांदीपासून अंबाबाईची मूर्ती बनवली आहे.
दरम्यान, पाच तास सुरू राहिलेल्या शोभायात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते. शोभायात्रेत हिरव्या साडय़ा परिधान करून महिला भाविक सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविक मूर्तीची पूजा करीत होते. महिलांनी फुगडी, लेझीमचा ठेका धरत आनंद साजरा केला. पुरूषांनीही लाल रंगाचे फेटे बांधले होते. शोभायात्रेच्या मार्गावर भाविकांनी मूर्तीचे दर्शन घेतले. साऊंड सिस्टिम, हलगी आणि धनगरी ढोलाच्या गजरात शोभायात्रा पुढे जात होती. सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बंगाली कारागीर संघाकडून प्रसाद वाटप
सराफ संघाच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गावर बंगाली कारागीर संघाने भाविकांना 100 किलोच्या प्रसादाचे वाटप केले. या प्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्वजीत प्रामाणिक, उपाध्यक्ष इंद्रजीत सामंत यांनी दिली.
अभिषेकचा निर्णय नवीन नियमावलीनंतरच
सराफ संघाच्यावतीने देणगी स्वरूपात देण्यात आलेल्या 51 किलो चांदीची मूर्ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने स्वीकारली आहे. ही मूर्ती सुरक्षेच्या दृष्टीने देवस्थानच्या कार्यालयात जमा करून घेतली आहे. अभिषेकाबाबतचा निर्णय नवीन नियमावलीनंतरच घेण्यात येईल. – शिवराज नाईकवाडे, सचिव देवस्थान समिती