कोल्हापूर / प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई मंदिरातील दक्षिणा पेट्य़ांमधील पैशाची मोजदाद मंगळवारपासून सुरु केली आहे. मंगळवारी एका दक्षिणा पेटीत 36 लाख तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दक्षिणा पेटीत तब्बल 67 लाख 65 हजार रुपये मिळाले. मंदिराच्या गरुड मंडपामध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी तीन या वेळेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कॅशिअर व देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सर्व पैशांची मोजदाद केली. परकीय चलन, सोन्याचे दागिने खजिन्यात जमा केले आहेत, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
अंबाबाई मंदिरात एकूण 12 दक्षिणा पेट्य़ा आहेत. प्रत्येक दोन महिन्यांनी दक्षिणा पेट्य़ांमधील पैशाची मोजदाद करण्याचे देवस्थान समितीने ठरवले आहे. दिवाळीनंतर आता दक्षिणा पेट्य़ांमधील पैशाची मोजदाद सुरू केली आहे. कोरोनानंतर अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. त्यामुळे या दोन महिन्यात लाखो भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. या भाविकांनी कासव चौकातील दक्षिणा पेटीत अंबाबाईच्या चरणी वाहिलेल्या दक्षिणाची मोजदाद सुरू आहे. पहिल्या दिवशी 36 लाख रुपये तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दक्षिणा पेटीत 67 लाख 65 हजार रूपये देवस्थान समितीला मिळाले आहेत. या पेट्य़ांमध्ये मंगळसुत्र, बिस्किट, गणपतीची मुर्ती अशी सोन्या-चांदीचे दागिणे आणि परकीय चलन मिळाले आहेत. सर्व सोन्या-चांदीचे दागिने अंबाबाई देवस्थानच्या खजिन्यात जमा केली आहेत. याचे व्हॅल्युएशन सोनाराकडून करून केले जाईल. तसेच अन्य चार दक्षिणा पेटीत किरकोळ रक्कम मिळेल, अशी माहिती समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.