प्रतिनिधी /धारबांदोडा
धारबांदोडा तालुका अंमलबजावणी पथक आणि गोवा केन यांनी धारबांदोडा परिसरात संयुक्तरित्या कारवाई करुन सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक फलक न लावलेल्या. मामलेदार कौशिक देसाई यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी ही कारवाई करण्यात आली. येथील पंचायत इमारत प्रकल्पामध्ये असलेल्या एकूण पाच आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली. त्यात पंचायत कार्यालयासह, एक राष्ट्रीयकृत बँक, पशुसंवर्धन खात्याचे कार्यालय, एक मद्यविक्री दुकान व भुसारी दुकानाचा समावेश आहे. यापैकी काही आस्थापनामध्ये तंबाखू प्रतिबंधक फलक नव्हते, तर काही ठिकाणी फलक होते, पण त्यावर तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारी सांकेतिक छायाचित्रे नव्हती. कौशिक देसाई यांच्यासह गोवा केनच्या सचिव लोर्ना फर्नांडिस, फिल्ड सर्व्हेयर निलेश दमेकर, स्वच्छता निरीक्षक विष्णू गावकर, नामदेव गावकर, पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण शेळके यांचा या पथकात समावेश होता.