ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां आणि त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये कालपासून चकमक सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी त्रालमध्ये एका चकमकीदरम्यान अंसार गजवा-तुल-हिंद या दहशतवादी संघटेचा मुख्य कमांडर इम्तियाज याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
त्रालच्या नोबग भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली. शोधमोहिमेदरम्याम मशिदीत लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत अंसार गजवा-तुल-हिंद या दहशतवादी संघटेचा मुख्य कमांडर इम्तियाजचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
गुरुवारपासून त्राल आणि शोपियांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत 7 दहशतवादी मारले गेले आहेत. तर 3 जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामधील एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.