www.dydekop.org या संकेतस्थळावर संपूर्ण अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार 7 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 7 ते 12 ऑगस्टपर्यंत प्रवेशाचा पहिला टप्पा व 14 ते 23 पर्यंत प्रवेशाचा दुसरा टप्पा होणार आहे. प्रवेशाचा दुसरा टप्पा झाल्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी करून 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती www.dydekop.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी दहावीच्या गुणपत्रकाची छायांकीत प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, विशेष आरक्षणाखाली प्रवेश घेणाऱयांनी त्या त्या आरक्षणासंबंधीचे पुरावे अर्जासोबत अपलोड करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना अडचण आल्यास www.dydekop.org या संकेतस्थळावरील माहिती पत्रकात नमूद केलेल्या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. गतवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाईन प्रवेश शुल्क फक्त 80 रूपये ठेवण्यात आले आहे. प्रवेश निश्चिती झाल्यानंतर संबंधीत महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दाखला नसल्यास हमीपत्र द्या
अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना एखाद्या विद्यार्थ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअर सर्टफिकेट नसल्यास, संबंधीत विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तकात दिलेले हमी पत्र भरून अपलोड करावयाचे आहे. यासंदर्भात शंका आल्यास माहिती पुस्तकातील संपर्क क्रमांकाशी संपर्क साधावा.
सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
तारीख प्रक्रिया
7 ते 12 ऑगस्ट भाग एक ऑनलाईन अर्ज भरावा
14 ते 23 ऑगस्ट भाग दोन ऑनलाईन अर्ज भरावा
24 ते 28 ऑगस्ट गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे
29 ऑगस्ट संकेतस्थळावर निवड यादी प्रसिध्द होणार
31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर प्रवेशाबाबत तक्रार निवारण
31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर निवड यादीनुसार विद्यार्थ्यांनी संबंधीत महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा.