बापू कांबळे यांना मिळणार 9 दिवसासाठी मान, माणगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासीक निर्णय
प्रतिनिधी/इचलकरंजी
वयाची नव्वदी पार केलेल्या आणि तब्बल अकरावेळा ग्रामपंचायत निवडणूक लढवून एकदाही निवडून न आलेल्या दलित समाजातील एका ज्येष्ठ नागरिकास नऊ दिवसासाठी सरपंचपद देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या माणगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. बापू पिरा कांबळे असे त्यांचे नाव असून 7 ते 15 ऑक्टोंबर या कालावधीत ते सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत.
माणगाव गावचे ज्येष्ठ नागरिक माणगाव बौद्ध समाजाचे ज्येष्ठ नेते ज्यांनी सन 1962 पासूनच्या माणगाव ग्रामपंचायतीच्या सर्व सार्वत्रिक निवडणुका लढवल्या. मात्र ते एकदाही निवडून आले नाहीत. 90 वर्षीय कांबळे यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच व सर्व सदस्यांच्या मान्यतेने तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर ग्रामपंचायत विभाग यांच्या पत्राच्या अधीन राहून या पदाचा मान देण्यात येणार आहे. आमदार प्रकाश आवाडे आण्णा व ग्रामविकास आघाडीचे अध्यक्ष जिनगोंडा पाटील, अनिल पाटील, आय. वाय. मुल्ला, नंदकुमार शिंगे, बाबासो सनदी, अशोक कांबळे, अविनाश माने तसेच ग्रामविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
आज स्वीकारणार पदभार
गुरुवारी दुपारी 12 वाजता माणगाव ग्रामपंचायतामध्ये त्यांचा सत्कार करण्यात येणार असून त्याचवेळी ते सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती माणगावचे विद्यमान सरपंच राजू मगदूम यांनी दिली.