ऑनलाईन टीम/ चंदिगढ :
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रम मजीठिया यांच्यासह 9 आमदारांवर चंदिगढच्या सेक्टर तीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल 10 मार्च रोजी विधानसभेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी शिरोमणी अकाली दलाच्या आमदारांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मनोहरलाल यांचे सुरक्षारक्षक आणि या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. या प्रकारावर विधानसभा सचिवालयाकडून तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला होता.
तसेच 13 मार्चला हरियाणाच्या विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी पंजाब, हरियाणा आणि यूटीच्या उच्चस्तरिय संयुक्त समितीकडून पाच दिवसात अहवाल मागितला होता. या अहवालानंतर संबंधित आमदारांवर कलम 186, 323, 341, 511 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.