दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष ; पंजाबमध्ये भाजपला होणार लाभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापक समितीचे प्रमुख मनजिंदर सिंह सिरसा यांनी बुधवारी अचानकपणे स्वतःच्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, पक्षाचे पंजाब प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत, राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांच्या उपस्थितीत सिरसा यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले. सिरसा यांच्या पक्षप्रवेशामुळे पंजाबमध्ये 3 महिन्यांनी होणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा लाभ होणार असल्याचे शेखावत यांनी म्हटले आहे.
सिरसा यांच्यासह अकाली दलाचे नेते राहिलेले परमिंदर सिंह बराड यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. अकाली दलाच्या विद्यार्थी शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेल्या बराड यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आता त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचे पाऊल उचलले आहे.
मनजिंदर सिंह सिरसा यांनी स्वतःच्या राजीनाम्यात गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य आणि महासचिवांना संबोधित करत वैयक्तिक कारणामुळै राजीनामा देत असल्याचे सांगितले. सिरसा यांनी राजीनाम्याची प्रत ट्विटरवर शेअर केली आहे.
अकाली दलात खळबळ
मनजिंदर सिंह सिरसा यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरोमणी अकाली दलात खळबळ उडाली आहे. सिरसा हे पक्षाचे प्रभावी नेते होते, यामुळे अकाली दलाला मोठा झटका बसला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पंजाबमध्ये अकाली दलाच्या अडचणी वाढू शकतात.